ठाण्यात कुत्रा पाळणे महागले

By admin | Published: January 7, 2016 12:42 AM2016-01-07T00:42:34+5:302016-01-07T00:42:34+5:30

ठाणे महापालिकेने अनिवासी आस्थापनांवर घनकचरा सेवा शुल्क लावले असतानाच आता आरोग्य विभागानेदेखील पाळीव कुत्र्यांच्या परवाना शुल्कात

Keeping dogs in Thane expensive | ठाण्यात कुत्रा पाळणे महागले

ठाण्यात कुत्रा पाळणे महागले

Next

ठाणे : ठाणे महापालिकेने अनिवासी आस्थापनांवर घनकचरा सेवा शुल्क लावले असतानाच आता आरोग्य विभागानेदेखील पाळीव कुत्र्यांच्या परवाना शुल्कात पाचपट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यास मंगळवारी झालेल्या बैठकीत स्थायी समितीने मंजुरी दिली. या नव्या प्रस्तावानुसार पाळीव कुत्र्यांच्या परवान्यासाठी १०० रुपयांऐवजी ५०० रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे आता पाळीव कुत्रे सांभाळण्याचा खर्चही वाढल्याने श्वानप्रेमींचे कंबरडे मोडणार आहे. याची अंमलबजावणी येत्या १ एप्रिलपासून होणार आहे.
ठाण्यात एकीकडे भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत असताना त्यात काही वेळेस पाळीव कुत्रेही अशा प्रकारे माणसाचा चावा घेतल्याच्या घटना समोर आल्यानंतर ठाणे महापालिकेने भटकी आणि पाळीव कुत्र्यांची वर्गवारी सुरू केली. त्यानुसार, पाळीव कुत्रे घ्यायचे झाल्यास त्याचा परवाना काढणे बंधनकारक करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला होता. त्यानुसार, मागील चार ते पाच वर्षांपासून अशा प्रकारे पाळीव कुत्र्यांसाठी परवाना दिले जात आहेत. तसेच त्यांच्या नैसर्गिक विधीच्या साफसफाईचा अतिरिक्त भार महापालिका कर्मचाऱ्यांवर पडत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यानुसार, महापालिकेने मुंबई प्रांतिक अधिनियमाच्या आधारे पाळीव कुत्र्यांसाठी नियम लागू केले आहेत. पाळीव प्राणी परवाना बंधनकारक केला असून त्यासाठी एका कुत्र्यासाठी १०० रुपयांचे परवाना शुल्क सुरुवातीला आकारण्यात येत होते.
दरम्यान, आता नव्या प्रस्तावानुसार यात तब्बल पाचपट वाढ करून ते ५०० रु पये केले आहे. तसेच बिल्ला, परवाना पुस्तकाचे शुल्क १०० रु पये केले असून यापूर्वी ते दहा रु पये इतके होते. शिवाय, महापालिकेच्या श्वानघरामध्ये कुत्रा ठेवण्याचा खर्च ४०० रुपये केला असून जुन्या दरानुसार त्यासाठी ५० रुपये आकारले जात होते. याशिवाय, परवाना नूतनीकरण केला नाहीतर दर महिन्याला २० ऐवजी १०० रुपये जादा मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे, पाळीव कुत्र्यांच्या परवाना सुरक्षा अनामत रक्कम शुल्कामध्येही पाचपट वाढ केल्याने नागरिकांना आता त्यासाठी २५०० रु पये भरावे लागणार आहेत. पाळीव कुत्र्यांसाठी परवाना सुरक्षा अनामत रक्कम महापालिकेत भरली आणि पुढील आर्थिक वर्षाच्या मार्चअखेर परवाना शुल्काची रक्कम भरली नाहीतर तुमची सुरक्षा अनामत रक्कम महापालिकेच्या फंडात जमा होणार असल्याची तरतूद नव्या प्रस्तावात केली आहे. तसेच परवाना घेतल्यानंतर वर्षाच्या आत श्वानाचा मृत्यू झाल्याचे किंवा श्वान दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केल्याचे श्वान नियंत्रण कक्षाला कळविले तर परवाना शुल्काची रक्कम संबंधितांना परत देण्याचीही तरतूद प्रस्तावात केली आहे.

Web Title: Keeping dogs in Thane expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.