केळकर रस्ता रुंदीकरण : बाधित व्यापारी, रहिवाशांसोबत बैठक
By Admin | Published: October 7, 2016 05:17 AM2016-10-07T05:17:37+5:302016-10-07T05:17:37+5:30
स्थानिकांच्या विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या केळकर रस्त्याच्या रुंदीकरणप्रकरणी गुरुवारी आयुक्त ई. रवींद्रन आणि या रुंदीकरणात बाधित होणारे रहिवासी
डोंबिवली : स्थानिकांच्या विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या केळकर रस्त्याच्या रुंदीकरणप्रकरणी गुरुवारी आयुक्त ई. रवींद्रन आणि या रुंदीकरणात बाधित होणारे रहिवासी, व्यापऱ्यांची बैठक महापालिका मुख्यालयात झाली. त्यात बाधित होणाऱ्यांची मते आयुक्तांनी जाणून घेतली. मनसेचे नगरसेवक मंदार हळबे यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीनंतर आता रवींद्रन काय अंतिम निर्णय घेतात, याकडे बाधितांचे लक्ष लागले आहे.
शहरातील केळकर मार्ग आणि दिनदयाळ रोड या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. यासाठी १ आॅक्टोबरची तारीख महापालिका प्रशासनाने निश्चित केली होती. परंतु, यात बाधित होणाऱ्या व्यापारी आणि रहिवाशांनी या रुंदीकरणाला विरोध दर्शविल्याने तुर्तास ही मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे. या मार्गाचे दोनदा रुंदीकरण झाले. पुन्हा तिसऱ्यांदा रुंदीकरणाचा घाट कशाला घातला जातोय, असा सवाल व्यापारी आणि रहिवाशांनी केला आहे. यावर बाधित होणारे नागरिक आणि आयुक्तांची विशेष बैठक घेण्याचे आश्वासन हळबे यांनी दिले होते. रुंदीकरणाच्या मुद्यावर चर्चा होऊन सर्वसमावेशक निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका हळबे यांनी घेतली आहे. अलिकडेच बालभवनमध्ये झालेल्या बैठकीत मोठ्या संख्येने बाधित होणारे व्यापारी आणि रहिवाशांनी उपस्थिती लावली होती.
रुंदीकरणाऐवजी डोंबिवलीत वाहतुकीचे धोरण ठरवा, लवकरच शहरात उड्डाणपुलांची निर्मिती होणार आह. त्यामुळे वाहतुककोंडीचा प्रश्न निकाली निघेल. यामुळे रुंदीकरणाची आवश्यकता भासणार नाही, याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले. आयुक्तांना ऐनवेळी मंत्रालयात जावे लागल्याने ते बैठकीला उपस्थित नव्हते. आयुक्त गैरहजर राहिल्याने त्यांच्या उपस्थितीत पुन्हा बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे हळबे यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार गुरुवारी मुख्यालयात बैठक झाली. यात रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी त्यांची मते आयुक्तांसमोर मांडली. आम्ही विकासा विरोधात नाही पण होणाऱ्या नुकसानीचे काय, असा सवाल यावेळी करण्यात आला. तर रस्ता रुंदीकरणाच्या आधी प्रायोगिक तत्वावर रिक्षास्टॅण्ड हटवावेत, ट्रान्सफार्मर दुसरीकडे स्थलांतर करून वाहतुकीचे नियोजन करावे आणि मगच निर्णय घ्यावा, काही जणांनी यावेळी क्लस्टर डेव्हलपमेंट तसेच इमारत पुर्नबांधणीला परवानगी द्यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. या बैैठकीला हळबे यांच्यासह शहरअभियंता प्रमोद कुलकर्णी, नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे आदी उपस्थित होते.
रुंदीकरण कोणासाठी?
च्फेरीवाला आणि रिक्षाचालकांसाठी रुंदीकरण नको, चुकीच्या रुंदीकरणाला मान्यता देणार नाही, अगोदर दोनदा केळकर रस्त्यावर रुंदीकरण झाले, त्याचा फायदा कोणाला झाला, असे सवाल यावेळी व्यापाऱ्यांनी उपस्थित केले.