मंत्रीपदासाठी केळकरांना हवा संघाचा आशीर्वाद
By admin | Published: April 25, 2016 03:03 AM2016-04-25T03:03:45+5:302016-04-25T03:03:45+5:30
राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात आपली वर्णी लागावी, याकरिता संजय केळकर यांनी व्यूहरचना सुरू केली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वजन आपल्याच पारड्यात पडावे,
ठाणे : राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात आपली वर्णी लागावी, याकरिता संजय केळकर यांनी व्यूहरचना सुरू केली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वजन आपल्याच पारड्यात पडावे, याकरिता ते प्रयत्नशील असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. शिवसेनेचे आक्रमक नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर भाजपाचा मवाळ व अभ्यासपूर्ण चेहरा म्हणून आपल्याला संधी मिळावी, असा प्रयत्न केळकर यांनी सुरू केल्याचे कळते.
रवींद्र चव्हाण हे कामाचा उरक व आक्रमकतेकरिता परिचित आहेत. मात्र, संघ परिवाराला ते फारसे आवडत नाहीत. किसन कथोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आल्याने त्यांच्यापेक्षा पक्षाचे स्वयंसेवक राहिलेल्या केळकर यांचाच मंत्रीपदाकरिता विचार व्हावा, असे काही नेत्यांना वाटते.
केळकर यांना मंत्रीपद दिले तरी ते ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देऊ शकतील किंवा कसे, याबाबत भाजपात भिन्न मतप्रवाह आहेत. शिंदे हे आक्रमक असल्याने त्यांच्याशी दोन हात करण्याकरिता तसाच आक्रमक नेता असावा व त्याला मंत्री करून ताकद द्यावी, असा एक मतप्रवाह आहे, तर शिंदे आक्रमक असल्याने भाजपाने नेमस्त व्यक्तीकडे नेतृत्व दिल्यास सुशिक्षित, शांतताप्रिय मतदार भाजपाकडे आकर्षित होतील, असा दुसरा मतप्रवाह आहे.
केळकर हे दोनवेळा कोकण पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे सुशिक्षित पदवीधर मतदारांत ते परिचित आहेत. तसेच ठाणे शहराध्यक्षपदाची धुराही काही महिने त्यांनी सांभाळली आहे. परंतु, ठाण्यातून ते प्रथमच आमदार म्हणून निवडून आले आहेत. शहराध्यक्षपदाची जबाबदारी जेव्हा त्यांच्या खांद्यावर होती, त्यावेळी विखुरलेल्या भाजपाला एकसंध करण्यात अपयश येत असल्याचे पाहून त्यांनी श्रेष्ठींना पत्र पाठवून पदमुक्त करण्याची विनंती केली होती. सध्यादेखील ठाण्यात भाजपा विखुरलेलीच आहे. काही नगरसेवकांमध्ये विस्तव जात नाही. त्यामुळे केळकर यावेळी तरी भाजपाला एकत्र आणतील की मंत्रीपद देऊनही पलायनवादी भूमिका घेतील, असा सवाल पक्षातील काही मंडळी करीत आहेत. तसे झाल्यास त्या मंत्रीपदाचा केवळ केळकर यांना लाभ होईल, असे बोलले जात आहे.
दरम्यान, आगामी ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काही महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून केली जाऊ शकते. (प्रतिनिधी)