केणी दाम्पत्य कोट्यधीशांतही वरचढ
By admin | Published: February 17, 2017 01:57 AM2017-02-17T01:57:59+5:302017-02-17T01:57:59+5:30
ठाणे महापालिका निवडणूक लढवत असलेल्या विविध पक्षांच्या ८०५ पैकी २०६ उमेदवार कोट्यधीश असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे : ठाणे महापालिका निवडणूक लढवत असलेल्या विविध पक्षांच्या ८०५ पैकी २०६ उमेदवार कोट्यधीश असल्याची माहिती समोर आली आहे. या कोट्यधीशांतही सर्वाधिक संपत्तीचा मान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वाट्याला गेला आहे. त्या पक्षाच्या उमेदवारांची सरासरी संपत्ती ४ कोटी ८७ लाख ७८ हजार ४८१ रूपयांची आहे.
त्या खालोखाल ३ कोटी २३ लाख ९१ हजार ५५६ एवढी सरासरी संपत्ती शिवसेनेच्या उमेदवारांकडे आहे. त्या खालोखाल भाजपाच्या उमेदवारांकडे दोन कोटी ९५ लाखांची, कॉंग्रेसच्या उमेदवारांकडे सरासरी २ कोटी २७ लाख आणि मनसेच्या उमेदवारांकजे सरासरी ५७ लाख ६७ हजारांची संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रांतील माहितीतून उघड झाले आहे.
२०६ कोट्यधीशांपैकी सर्वाधिक संपत्तीचा मान कळव्यातील केणे दामप्त्याकडे जातो. प्रमिला केणी यांच्या नावावर ६७ कोटी ९६ लाख २४ हजार ४२ रुपयांची संपत्ती असून त्यांचे पती मुकुंद केणी यांच्या नावावर ६६ कोटी ८७ लाख ५५ हजार २७३ रूपयांची संपत्ती आहे. कोट्यधीश उमेदवारांची सर्वाधिक म्हणजे ५७ एवढी संख्या शिवसेनेच्या खाती जमा आहे. पालिका निवडणुकीच्या रिंगणातील अनेक उमेदवारांची मालमत्त्ता कोट्यवधींच्या घरात पोहोचल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रातील स्थावर आणि जंगम मालमत्तेच्या लेखाजोख्यातून दिसते.
कोट्यधीशांच्या २०६ या संख्येपैकी शिवसेनेचे ५७, भाजपाचे ४७, राष्ट्रवादीचे ३६, कॉंग्रेसचे २०, मनसेचे १३, बहुजन समाज पार्टीचा १, एमआयएमचा १ आणि अपक्षांसह इतर पक्षांचे ३१ उमेदवार कोट्यधीश आहेत.
सर्वाधिक संपत्ती जाहीर करणाऱ्या पक्षात राष्ट्रवादी अव्वल स्थानी आहे. अन्य पक्षांच्या उमेदवारांच्या सरासरी संपत्तीत एमआयएम २६ लाख ७१ हजार १३७, समाजवादी १२ लाख ३२ हजार ४८६, बहुजन समाज पार्टी ४२ लाख ७२ हजार ७४, मुस्लिम लीग २१ लाख ०२ हजार, तोक जनशक्ती पार्टी ५ लाख ११ हजार, तर इतर आणि अपक्ष असे ५५ लाख ०४ हजारांची संपत्ती दाखविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)