Ketaki Chitale: केतकी चितळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; वकिलांचा जामीनासाठी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 01:16 PM2022-05-24T13:16:00+5:302022-05-24T13:36:01+5:30
Ketaki Chitale: केतकी चितळेचे वकील वसंत बनसोडे यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. नेमकं प्रकरण काय?
ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राज्यात अनेकविध ठिकाणी तिच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, २०२० मधील एका प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर न्यायालयाने जामीन नाकारला तरीही तिला रबाळे पोलिसांनी अटक न केल्याचे प्रकरण उजेडात आणण्यात आले. यानंतर केतकी चितळेला रबाळे पोलिसांनी ताब्यात घेतले. ठाणे न्यायालयासमोर हजर केल्यानंतर सुरुवातीला केतकी चितळेला ५ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. आता मात्र, तिला याच प्रकरणात १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
केतळी चितळेची पोलीस कोठडी संपत होती. त्यामुळे तिला पुन्हा एकदा ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. रबाळे पोलिसांनी दाखल केलेल्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात केतकी चितळेला ठाणे न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर केतकीचे वकील वसंत बनसोडे यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती देण्यात आली आहे.
‘ती’ पोस्ट हटवण्यास केतकी चितळेचा नकार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या विरोधात टाकलेली पोस्ट सोशल मीडियावरून हटवण्यास केतकी चितळे हिने पोलिसांना नकार दिला आहे. आपल्या मर्जीनेच आपण ती टाकल्याच्या निर्णयावर ती अद्यापही ठाम आहे. परंतु, या पोस्टमुळे अद्यापही वाद उफाळून येत असतानाही सायबर सेलकडून ती हटवली जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. पवार यांच्यावर टीका करणारी पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळे हिला अटक केली आहे. तिच्या पोस्टमुळे राज्यात राजकीय वाद उफाळून आला आहे. यामुळे ती पोस्ट हटवण्यासंदर्भात पोलिसांनी केतकीला सूचना केल्या आहेत. परंतु, तिने पोस्ट हटवण्यास नकार देऊन आपल्या मर्जीने ती पोस्ट टाकल्याचे सांगितले आहे. यामुळे अद्यापही त्या पोस्टवर वादग्रस्त प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. अशातच सायबर सेलनेदेखील ती पोस्ट हटवलेली नाही. त्यामुळे पोस्टवर अद्यापही नवे वाद निर्माण होतील अशा प्रतिक्रिया येत आहेत. सायबर सेलने अद्यापही पोस्ट न हटवण्यामागचे नेमके कारण काय, असाही प्रश्न उपस्थित केला आहे.
दरम्यान, २०२० मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात केतकी चितळेविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. केतकी व सूरज शिंदे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांबद्दल संतापजनक वक्तव्य केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तिने अटकपूर्व जामिनासाठी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज केला होता. तर सूरज शिंदे नावाच्या व्यक्तीचा शोध घेऊनही तो न सापडल्याने पोलिसांनी त्याला फरार घोषित केले आहे. न्यायालयाने सप्टेंबर २०२१ मध्ये केतकीचा अटकपूर्व अर्ज फेटाळल्याने नवी मुंबई पोलिसांकडून तिला अटक होणे अपेक्षित होते. परंतु, तत्कालीन अधिकाऱ्यांनी चालढकल करून आठ महिन्यांपासून तिची अटक टाळल्याचा आरोप करण्यात आला आहे.