ठाण्यात मराठी मतदारांच्या हाती विजयाची किल्ली; मते आपल्याकडे वळविण्यासाठी सेनेच्या दोन्ही गटांत रस्सीखेच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 09:21 AM2024-05-10T09:21:26+5:302024-05-10T09:21:37+5:30
ठाणे लोकसभा मतदारसंघ मीरारोड-भाईंदर ते नवी मुंबई, बेलापूरपर्यंत विस्तारलेला आहे. २०१९ च्या निवडणुकीत एकूण मतदारसंख्या २३ लाख ७ हजार २३२ एवढी होती.
- अजित मांडके
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात प्रथमच दोन शिवसैनिकांमध्ये सरळ लढत असल्याने या मतदारसंघातील मराठी भाषिक ५१ टक्के मते निर्णायक ठरणार आहेत. मराठी मतांचा टक्का अधिकाधिक आपल्याकडे वळविण्यासाठी शिंदेसेना आणि उद्धवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मराठी माणसाच्या हिताकरिता स्थापन झालेली शिवसेना फुटल्याने मराठी मतदार रांगा लावून मतदान करतो की, निराश होऊन घरी बसतो, हे २० मे रोजी स्पष्ट होईल.
ठाणे लोकसभा मतदारसंघ मीरारोड-भाईंदर ते नवी मुंबई, बेलापूरपर्यंत विस्तारलेला आहे. २०१९ च्या निवडणुकीत एकूण मतदारसंख्या २३ लाख ७ हजार २३२ एवढी होती. त्यांपैकी ४९.३७ टक्के मतदान झाले होते. यावेळी मतांचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनासह राजकीय पक्षांचा प्रयत्न सुरू आहे.
शिवसेनेचे दोन गट झाल्यामुळे आणि निवडणुकीत तेच परस्परांच्या विरोधात उभे ठाकल्याने मराठी मतांचे विभाजन अटळ आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक विकासकामे केली आहेत. महापालिकेत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता राहिली आहे. त्याचा लाभ त्यांना होईल. उद्धवसेनेचे उमेदवार राजन विचारे हे जुने शिवसैनिक आहेत. त्यांनी खासदार निधीतून कामे केली आहेत. त्यावर त्यांची भिस्त आहे. ठाण्यातील निवडणुकीत ‘निष्ठावंत विरुद्ध गद्दार’ हाच प्रचाराचा मुद्दा आहे. मराठी मतदार या प्रचारामुळे घराबाहेर मोठ्या प्रमाणावर पडून मतदान करतो की, मराठी माणसांची शिवसेना फुटल्यामुळे व्यथित होऊन घरात बसतो, हे मतदानाच्या दिवशी दिसेल.
मतदारांची संख्या किती ?
एकूण २४,०९,५१३
पुरुष मतदार १३,३९,५९०
महिला मतदार ११,५०,७१६
मराठी भाषक १२,९५,०६६
उत्तर भारतीय ५,४७,९१२
मुस्लिम २,९८,८६१
गुजराती १,७४,३७५
पंजाबी, सिंधी ४९,८१०
इतर ४९,८१४