केडीएमसीच्या उपायुक्तांना खड्डेरत्न पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:49 AM2019-09-01T00:49:40+5:302019-09-01T00:49:50+5:30

मनसेचे आगळेवेगळे आंदोलन । रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण

Khaddernat Award for Deputy Commissioner of KDMC | केडीएमसीच्या उपायुक्तांना खड्डेरत्न पुरस्कार

केडीएमसीच्या उपायुक्तांना खड्डेरत्न पुरस्कार

googlenewsNext

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरांतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले असून गणपतींचे आगमनही खड्ड्यांतूनच होणार आहे. महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने मनसेने मिरवणूक काढून महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी महापालिका उपायुक्त मारुती खोडके यांना खड्डेरत्न पुरस्कार देऊन अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांंनी मनसे कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली.

मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांच्यासह विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, गटनेते मंदार हळबे, परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे, महिला आघाडीच्या मंदा पाटील, पदाधिकारी सागर जेधे, राहुल कामत, निलेश भोसले, विजय शिंदे, संजीव ताम्हाणे, मिलिंद म्हात्रे, प्रतिभा पाटील आदींनी मनसेच्या शहर शाखेतून वाजतगाजत खड्डेरत्न पुरस्काराची ट्रॉफी घेऊ न रस्त्यातील खड्ड्यांतून महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या दिशेने मिरवणूक काढली. यावेळी महापालिकेविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. भरपावसात कार्यकर्ते महापालिका कार्यालयाच्या दिशेने निघाले. त्यांचा मोर्चा कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येताच सुरक्षारक्षकांसह पोलिसांनी कार्यालयाचे गेट बंद करून घेतले. मनसे कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराविरोधात निषेधाच्या घोषणा देत कार्यकर्ते महापालिकेच्या आत येणार नाहीत. अधिकाऱ्यांना बाहेर बोलवा. आम्हाला आयुक्तांना पुरस्कार द्यायचा आहे. मनसेच्या जोरदार घोषणाबाजीमुळे उपायुक्त खोडके हे प्रवेशद्वाराबाहेर गेले. यावेळी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी खड्डेरत्न पुरस्कार देण्याऐवजी खड्ड्यांत उभे करून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्याचा आग्रह धरला. यावेळी उपायुक्त सुरक्षेच्या गराड्यात कार्यकर्त्यांचे धक्के खात महापालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर गेले. तेथे कार्यकर्त्यांनी खड्डेरत्न पुरस्काराची ट्रॉफी त्यांच्या हाती देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी मज्जाव केल्याने कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. खोडके यांना सडलेल्या फुलांचा बुके, फाटकी शाल देऊन प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याची मागणी वारंवार करण्यात आली; मात्र प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने गणेशाचे आगमन रस्त्यावरील खड्ड्यांतूनच होत आहे. गणेश विसर्जनापूर्वी खड्डे भरले गेले नाहीत, तर यापुढचे आंदोलन आयुक्तांच्या घरात घुसून केले जाईल, असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी दिला आहे. शहरातील पत्रीपुलाचे काम दिरंगाईने सुरू आहे. वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत असून डोंबिवलीतील कोपर उड्डाणपूल बंद करण्याचा घाट घातला आहे. पुलांच्या बांधणीचे नियोजन नाही. त्यात रस्त्यावरील पडलेले खड्डे बुजवले जात नाहीत. त्यामुळे कोंडीत भर पडत आहे.

राज्यमंत्र्यांचे काँक्रिटीकरणाचे गाजर!
मुख्यमंत्र्यांनी कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी सहा हजार ५०० कोटी रुपये देण्याचे गाजर दिले. तसेच आता निवडणुकीच्या तोंडावर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी निधी मंजूर झाल्याचे चॉकलेट दिले असल्याचा आरोप मनसेने यावेळी केला आहे.
 

Web Title: Khaddernat Award for Deputy Commissioner of KDMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.