खाकी वर्दीतील माणुसकीचा प्रत्यय, ठाणेकरांना दिला मदतीचा हात, तातडीने हलविले सुरक्षितस्थळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 06:07 AM2017-08-31T06:07:32+5:302017-08-31T06:07:42+5:30
मुसळधार पावसामुळे मंगळवारी सर्वत्र दाणादाण उडालेली असताना पोलीस यंत्रणेने ठाणेकरांना मदतीचा हात दिला. पोलीस ठाण्यांनी आपल्या हद्दीतील मोर्चा सांभाळून या नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेल्या रहिवाशांना दिलासा दिला.
ठाणे : मुसळधार पावसामुळे मंगळवारी सर्वत्र दाणादाण उडालेली असताना पोलीस यंत्रणेने ठाणेकरांना मदतीचा हात दिला. पोलीस ठाण्यांनी आपल्या हद्दीतील मोर्चा सांभाळून या नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेल्या रहिवाशांना दिलासा दिला.
राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीरंग सासायटी तसेच वृंदावन सोसायटीसह आझादनगर आणि गोकुळनगरात पावसाचे पाणी तुंबले होते. राबोडी पोलीस ठाण्यासमोरही जवळपास कमरेपर्यंत पाणी साचले होते. अशा परिस्थितीत पोलिसांनी पाणी तुंबलेल्या भागांमध्ये पोहोचून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविले. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वे स्थानकावर रात्री प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. पावसामुळे आॅटोरिक्षा चालक प्रवाशांना घेऊन जाण्यास टाळाटाळ करीत होते. ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी पथकासह रेल्वे स्थानकावर पोहोचून प्रवाशांना आॅटोरिक्षाची सोय करून दिली.
कळव्यातील वाघोबा नगरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. याशिवाय घोलाई नगरात पावसामुळे सहा घरांची पडझड झाली होती. अशा स्थितीतही येथील रहिवासी घरे सोडण्यास तयार नव्हती. कळवा पोलिसांनी त्यांना समजावून आपत्कालीन यंत्रणेच्या मदतीने २0 रहिवाशांना अन्यत्र हलविले.
कापूरबावडीनाका, कोलशेत, यशस्वीनगर, मनोरमानगर आणि ढोकाळी परिसरात रस्त्यांवर कमरेपर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे कापूरबावडीनाक्यावरून ढोकाळीकडे जाणारी वाहतूक बंद केली होती. याशिवाय घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी झाल्याने सर्व वाहने कापूरबावडीनाक्यावरून मागे पाठविली जात होती. कापूरबावडी पोलिसांनी काही वाहने नाशिक रोडने वळविली.
मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता पोलीस आयुक्तांनी अधिकाºयांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या होत्या. नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या अशा बिकट परिस्थितीमध्ये पोलिसांची उपस्थिती सामान्यांसाठी दिलासादायक असते. त्याची प्रचिती मंगळवारी ठाणेकरांना आली.
वाहनधारकांत सामंजस्याचा अभाव
चोहोकडून येणारी वाहनांची गर्दी आणि कमरेपर्यंत तुंबलेले पाणी, यामुळे कळवा नाक्यावर मंगळवारी रात्री प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अशा स्थितीत कळवा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक इर्शाद सय्यद यांना अक्षरश: पोहत जाऊन वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला. चुकीच्या बाजुने वाहने आडवी घालून वाहतूक कोंडीत भर घालण्याचा प्रयत्न काही वाहनधारक करीत होते. त्यांची समजूत घालून वाहतूक मोकळी करण्याचा प्रयत्न उपनिरीक्षक सय्यद यांनी केला. वाहनधारक मात्र त्यांचे ऐकण्याऐवजी वाद घालत होते. त्यामुळे या नाक्यावर बराच वेळ वाहतूक कोंडी कायम होती.
चिखलवाडीतील रहिवाशांची सुटका
नौपाड्यातील चिखलवाडीत भिषण परिस्थिती निर्माण झाली होती. रात्री ८ वाजेपर्यंत या भागातील दोन इमारतींच्या तळमजल्यापर्यंत पाणी शिरले होते. जवळपास ३0 रहिवासी या इमारतींमध्ये अडकले होते.
पोलीस उपायुक्त डॉ. डि.एस. स्वामी, नौपाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, प्रकाश पाटील, संजय धुमाळ आणि त्यांच्या पथकाने येथे मदतकार्य राबविले. पाणी एवढे तुंबले होते की, दोन शिपायांनी पोहत जाऊन रहिवाशांची सुटका केली.
अग्निशमन दलाचे जवान पोहोचल्यानंतर बोटीच्या सहाय्याने काही रहिवाशांची सुटका करण्यात आली. एका इमारतीमध्ये मिश्रा कुटुंबिय दोन भाऊ, त्यांच्या पत्नी आणि मुलांसह अडकले होते. पोलिसांनी बरीच समजूत घातल्यानंतर ते बाहेर पडण्यास तयार झाले.
अत्यवस्थ
महिलेला मदत
साचलेल्या पाण्यात कापूरबावडी नाक्यावरील वाहतूक कोंडी अत्यवस्थ आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणाºया मानपाड्यातील महिलेची कार रस्त्यातच नादुरूस्त झाली. तिलाही पोलिसांनी लगेचच मदतीचा हात दिला.