खाकी वर्दीतील माणुसकी , पोरांनी नाकारलेल्या आईचा पोलीसच झाले आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:05 AM2018-02-21T01:05:50+5:302018-02-21T01:05:54+5:30
मरणासन्न अवस्थेत असलेल्या वृध्द आईला पोटच्या तीन मुलांनी नाकारत निराधार अवस्थेत सोडून दिले, पण अखेर बाजारपेठ पोलिसांनी तिला आधार दिला आहे.
कल्याण : मरणासन्न अवस्थेत असलेल्या वृध्द आईला पोटच्या तीन मुलांनी नाकारत निराधार अवस्थेत सोडून दिले, पण अखेर बाजारपेठ पोलिसांनी तिला आधार दिला आहे. स्वखर्चाने त्यांनी वृध्द आईला ठाण्यातील रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आणि पोलिसांतील-खाकी वर्दीतील माणुसकीच्या ओलाव्याची प्रचिती दिली.
पश्चिमेतील लालचौकी परिसरात रस्त्याच्या कडेला एक वृध्द महिला पडून असल्याचा कॉल नियंत्रण कक्षाने सोमवारी संध्याकाळी घेतला आणि त्याची माहिती तत्काळ बाजारपेठ पोलीस ठाण्याला कळविली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पाय सुजलेल्या अवस्थेत एक वृध्द महिला तेथे पडून होती. बाजारपेठ पोलिसांनी रुग्णवाहिका करुन तिला महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल केले. तिच्याकडे विचारपूस केली असता, ६५ वर्षीय वृध्देने तिचे नाव रमाबाई दत्तात्रय खंडागळे असल्याचे सांगितले. तिचे नातेवाईक, कोणी वारस आहे का? याविषयी विचारणा केली असता तिने दोन मुले आणि एक मुलगी असल्याचे पोलिसांना सांगितले. दोन्ही मुले आणि मुलगी विवाहित आहेत.
पोलिसांनी रिक्षा करुन तिच्या मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मुले सापडली आणि त्यांनी रमाबाई ही आपली आई असल्याचे पोलिसांना सांगितले.पण तिला आमच्याकडे आणू नका, असे सांगायला मुले विसरली नाहीत. तिच्या सुनाही तिला घरी घेऊन येऊ नका, असे म्हणाल्याने पोलिसांची आशा मावळली. दोन्ही मुले चांगल्या ठिकाणी कामाला आहेत, तरीही त्यांनी आईला असे नाकारल्यानंतर पोलिसांना शेवटची आशेचा किरण दिसला. तो म्हणजे रमाबाईची मुलगी मीनाक्षी हिचा. पोलिसांनी तिचा शोध घेतला. रमाबाईची मुलगी तरी तिला आपले म्हणेल, या आशेवर पोलीस तिच्या घरी पोचले. ती नर्सचे काम करते. तिनेही आईला माझ्या घरी आणू नका, असे सांगताच पोलीस सुन्न झाले.
अखेर बाजारपेठ पोलीसच या वृध्द महिलेचे वारस झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांनी पोलिसांच्या मदतीने रमाबाई यांना ठाण्याच्या सिव्हील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले.
दुसºयाच्या घरची कामे करुन मी माझ्या मुलांना शिक्षण दिले. त्यांना मोठे केले. मुले आपल्या पायावर उभी राहिल्यावर म्हातारपणी- आजारपणात मला आधार देतील, अशी माझी अपेक्षा होती. पण त्याऐवजी त्यांनीच मला निराधार केले. माझी प्रॉपर्टीही मुलांनी घेतली, असे मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या रमाबाई यांनी पोलिसांना सांगितले. तेव्हा त्यांची कशी समजूत काढावी हे पोलिसांना समजेना.