खलीची आता मुंबई ‘एटीएस’कडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 11:44 PM2019-03-04T23:44:40+5:302019-03-04T23:44:45+5:30

रविवारी सकाळी मध्य रेल्वेच्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या अफगाणिस्तानच्या मोहम्मद शेर खान याला संशयावरून लोहमार्ग पोलिसांनी ठाण्यात ताब्यात घेतले होते.

Khali is now called by the Mumbai ATS | खलीची आता मुंबई ‘एटीएस’कडून चौकशी

खलीची आता मुंबई ‘एटीएस’कडून चौकशी

Next

ठाणे : रविवारी सकाळी मध्य रेल्वेच्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या अफगाणिस्तानच्या मोहम्मद शेर खान याला संशयावरून लोहमार्ग पोलिसांनी ठाण्यात ताब्यात घेतले होते. चौकशीअंती १० ते १२ तासांनी लोहमार्ग पोलिसांनी खलीसारख्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाच्या शेर खानला सोडले असले, तरी आता दहशतवादविरोधी पथकाने त्याला मुंबईत चौकशीसाठी नेल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुलवामा हल्ल्यानंतर गर्दीच्या रेल्वेस्थानकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, रेल्वे पोलिसांनी संशयित वस्तू आणि व्यक्तींची माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. त्यानुसार, रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एका पोलिसाने ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयात फोन केला. त्या माहितीच्या आधारे रेल्वे प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क केले. त्यानंतर, सीएसएमटी-टिटवाळा लोकल ठाण्यात दाखल होताच, पोलिसांनी तिचा ताबा घेतला. त्यावेळी एका डब्यात पठाणी पोशाख धारण केलेली सहा फुटांपेक्षा जास्त उंची आणि भारदस्त शरीरयष्टी असलेली व्यक्ती डब्यात बसली होती. प्रथमदर्शनी ही व्यक्ती कुणालाही संशय येईल, अशीच होती.
पोलिसांनी शेर खानला ताब्यात घेऊन डब्यातील इतर प्रवाशांना बाहेर पडण्याचे आवाहन केले. त्यानंतर, श्वान पथकाद्वारे संपूर्ण डब्याची तपासणी करून मगच लोकल पुढे सोडण्यात आली. काबूलच्या या पठाणास पाहून प्रवाशांमध्ये ठाण्यात खली अवतरल्याची कुजबूज सुरू होती. त्यानंतर, लोहमार्ग पोलिसांनी शेर खानची सकाळी ११.३० वाजण्यापासून रात्री जवळपास ११ वाजेपर्यंत चौकशी केली.
लोहमार्ग पोलिसांनी जवळपास चार तास, तर उर्वरित वेळेत दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्याने स्वत:चा पासपोर्ट, व्हिसा पोलिसांना दाखवला. चौकशीत काहीच आक्षेपार्ह न आढळल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला; मात्र खातरजमा करण्यासाठी दहशतवादविरोधी पथक त्याला मुंबई येथे चौकशीसाठी घेऊन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, त्याला भेटण्यासाठी त्याचे दोन साथीदार आल्याची माहितीही सूत्रांनी दिली. दरवर्षीप्रमाणे आपण यंदाही काही दिवसांपासून मुंबईत आलो होतो. कामानिमित्त मुंबईसह इतरत्र फिरताना कुतुहलापोटी बरेच जण आपल्यासोबत फोटोही काढतात, असे शेर खानने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले.
शेर खानच्या चौकशीतून आतापर्यंत काहीच बाहेर आले नसले, तरी ठाण्यात अवतरलेल्या या खलीने एकूणच यंत्रणेची दोन दिवस तारांबळ उडाली. यानिमित्ताने या यंत्रणेची सतर्कताही दिसली.
उपचारासाठी जुळवाजुळव
आपण सर्वसामान्य नागरिक असून आपल्या उंचीमुळे झालेल्या आजारावर औषधोपचारासाठी भारतात आलो. येथील पठाणी लोकांची भेट घेऊन, त्यांच्याकडून उपचारासाठी पैसे गोळा करत आहे. त्यासाठी आपण फिरत आहोत, असे त्याने पोलिसांना सांगितले. आपण दरवर्षी भारतात येत असल्याचेही त्याने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.
>मोहम्मद शेर खानला रात्री उशिरा सोडून दिले. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भाष्य करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे तो कुठे गेला, त्याला कोणी नेले, याबाबत माहिती देणे शक्य नाही. आम्ही त्याची चौकशी करून सोडले आहे.
- स्मिता ढोकणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (प्रभारी),
लोहमार्ग पोलीस, ठाणे

Web Title: Khali is now called by the Mumbai ATS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.