खंबाळपाडा परिसरात उग्र दर्पाने रहिवासी त्रस्त, वायुप्रदूषणाचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 12:56 AM2019-11-11T00:56:04+5:302019-11-11T00:56:09+5:30
औद्योगिक विभागातील फेज-१ पट्ट्यात आठ दिवसांपासून वायुप्रदूषणाचा नागरिकांना त्रास जाणवू लागला आहे.
डोंबिवली : औद्योगिक विभागातील फेज-१ पट्ट्यात आठ दिवसांपासून वायुप्रदूषणाचा नागरिकांना त्रास जाणवू लागला आहे. दोन दिवस दर्पाची तीव्रता अधिक वाढल्याने खंबाळपाडा परिसरात मळमळणे आणि उलट्यांचा त्रास स्थानिक रहिवाशांना सुरू झाला आहे. याबाबत सोमवारी रहिवासी एमआयडीसी आणि प्रदूषण कार्यालयात धाव घेणार आहेत.
औद्योगिक परिसरात अनेक रासायनिक कंपन्या असून त्यातून अधूनमधून तीव्र स्वरूपाचे वायुप्रदूषण होत असते. यात उघडे नाले आणि गटारांमधून कोणतीही प्रक्रिया न करता रासायनिक सांडपाणी सोडण्यात येत असल्याने याचा फटका स्थानिक रहिवाशांना बसतो. सध्या खंबाळपाडा भागात या प्रदूषणाची तीव्रता अधिक जाणवत आहे. रात्री हा दर्प ठाकुर्ली परिसरातील ९० फूट रोड परिसरापर्यंत पसरलेला असतो. या प्रदूषणाकडे गांभीर्याने का पाहत नाही, असा सवाल रहिवाशांचा आहे. खंबाळपाडा, भोईरवाडी परिसरात राहणारे काळू कोमास्कर यांनी अनेक दिवसांपासून हा त्रास सुरू असल्याचे सांगितले.
>प्रदूषण मंडळाच्या कार्यालयाला भेट देणार
रात्री उशिरा येथील रासायनिक कंपन्या प्रचंड दुर्गंधीयुक्त जल व वायुप्रदूषण करत आहेत. फेज-१ मध्ये केमिकल झोन नसतानाही याठिकाणी केमिकल कंपन्या बेकायदेशीरपणे उभारल्या आहेत, याकडे कोमास्करांनी लक्ष वेधले आहे. शनिवार आणि रविवार एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण कार्यालयाला सुटी असल्याने सोमवारी आम्ही स्थानिक नागरिक संबंधित कार्यालयांना भेट देऊन अधिकाऱ्यांचे प्रदूषणाच्या समस्येकडे लक्ष वेधणार आहोत, अशी माहिती कोमास्कर यांनी दिली.