खारबाव जीपी पारसिक बँकेच्या अडीच तासांच्या लंच ब्रेकने खातेदार हैराण
By नितीन पंडित | Published: December 18, 2023 04:06 PM2023-12-18T16:06:55+5:302023-12-18T16:07:21+5:30
खारबाव परिसरातील आदिवासीबहुल खातेदारांसह मध्यमवर्गीय शेतकऱ्यांचे खाते या बँकेत आहेत.
भिवंडी: तालुक्यातील खारबाव येथील जी पी पारसिक सहकारी बँकेत तब्बल अडीच तासांच्या लंच ब्रेक ने खातेदार हैराण झाले आहेत. या बँकेत परिसरातील अनेक शेतकरी,मजूर व गरीब मध्यमवर्गीय नागरिकांची खाते असून बँकेच्या दुपारच्या अडीच तासांच्या लंच ब्रेक ने खातेदार हैराण झाले आहेत.
खारबाव परिसरातील आदिवासीबहुल खातेदारांसह मध्यमवर्गीय शेतकऱ्यांचे खाते या बँकेत आहेत जी पी पारसिक बँकेची खारबाव शाखा सकाळी दहा वाजता सुरू होत असून दुपारी दीड वाजता बँकेत दुपारच्या बँक कर्मचाऱ्यांचा जेवणाचा वेळ ठेवण्यात आला आहे.त्यानंतर हि बँक तब्बल अडीच तासांनी सायंकाळी चार वाजता सुरू होते. बँकेच्या अडीच तासांच्या लंच ब्रेक ने बँकेबाहेर अनेक नागरिक ताटकळत बसलेले असतात.सायंकाळी चार नंतर सुरु झालेली बँक सात वाजे पर्यंत सुरु ठेवण्यात येते.मात्र दुपारी कामातून वेळ काढून बॅंकेत आलेल्या खातेदारांना आपल्या स्वतःच्या हक्काच्या पैशांसाठी अडीज तास ताटकळत बसावे लागत आहे.
बँकेच्या या अवेळच्या दिर्घ लंच ब्रेकमुळे बँकेचे खातेदार हैराण झाले असून इतर कोणत्याही बँकेत अशा प्रकारचा अडीच तासांची जेवणाची सुट्टी देण्यात येत नाही मग या बँकेत एवढी जेवणासाठी एवढी सुट्टी का असा सवाल खातेदार विचारत आहेत.मात्र दुपारच्या जेवणानंतर हे कर्मचारी बँकेची अंतर्गत कार्यालयीन कामे करत असल्याने एवढी सुट्टी देण्यात येत असल्याची माहिती काही खातेदारांकडून मिळत आहे.मात्र खारबाव परिसरात आदिवासी बहुल ग्रामीण भागात असलेल्या या बँकेतील कर्मचाऱ्यांवर नेमका कोणता कामाचा ताण पडतो ज्यासाठी कर्मचाऱ्यांना अडीच तासांचा लंच ब्रेक लागतो अशी चर्चा खातेदार करत आहेत.