खारेगाव-घोडबंदर कोस्टल रोड दृष्टीपथात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:29 AM2021-06-02T04:29:47+5:302021-06-02T04:29:47+5:30

ठाणे : गेली १२ वर्षे कागदावर असलेला मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव ते घोडबंदरला जोडणारा गायमुख चौपाटीपर्यंतचा कोस्टल आता ...

Kharegaon-Ghodbunder Coastal Road in sight | खारेगाव-घोडबंदर कोस्टल रोड दृष्टीपथात

खारेगाव-घोडबंदर कोस्टल रोड दृष्टीपथात

Next

ठाणे : गेली १२ वर्षे कागदावर असलेला मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव ते घोडबंदरला जोडणारा गायमुख चौपाटीपर्यंतचा कोस्टल आता खऱ्या अर्थाने मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ठाणे महापालिकेने या रस्त्याचा आराखडा तयार करून तो एमएमआरडीएकडे पाठविला आहे. तर एमएमआरडीएने सीआरझेडच्या परवानग्या घेण्याच्या सूचना केल्याने त्यानुसार महापालिकेने प्रस्ताव तयार करून तो एमसीझेड म्हणजे महाराष्ट्र किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.

या कोस्टल रोडमध्ये सुमारे १३ किलोमीटरचा मार्ग असणार असून काही ठिकाणी उन्नत तर काही ठिकाणी भुयारी मार्ग असणार आहे. यासाठी एक हजार २५१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गामुळे घोडबंदरमधील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अवजड वाहनांचा भार कमी होऊन कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. २००९ मध्ये कोस्टल रोडची चर्चा सुरू झाली होती. परंतु, आता महापालिकेने आराखडा तयार केल्यामुळे तो सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे. उरण येथील जेएनपीटी बंदरातून गुजरात, नाशिक आणि भिवंडीच्या दिशेने अवजड वाहतूक सुरू असते. त्याचबरोबर या शहरातून बंदराच्या दिशेनेही ती सुरू असते. यापैकी जेएनपीटी बंदर ते गुजरात या मार्गावरील वाहने घोडबंदरमधील मुंबई-अहमदाबाद महामार्गाचा वापर करतात. या वाहनांची संख्याही मोठी आहे. यामुळे ठाण्यातील माजिवाडानाक्यापासून ते घोडबंदर टोलनाक्यापर्यंत वाहतूककोंडी होते. या भागातील नागरिकांना वाहतुकीसाठी मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे त्यांच्याकडून संतापही व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अवजड वाहतुकीचा भार कमी करून वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव ते घोडबंदरमधील गायमुख चौपाटीपर्यंत हा कोस्टल रोड असणार आहे. या मार्गावरून अवजड वाहतूक सोडली जाणार आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकल्पाचा आराखडा नुकताच तयार केला असून तो आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे पाठविला आहे.

हा मार्ग सुमारे १३ किलोमीटरचा असणार आहे. महापालिकेच्या विकास आराखड्याुनसार ४० ते ४५ मीटरचा आठपदरी रस्ता असणार आहे. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी एक स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात येणार आहे. १.१३ किलोमीटरचा उन्नत मार्ग, ५०० मीटरचा भुयारी मार्ग, वाघबीळ भागात जाण्यासाठी मार्गिका असा हा मार्ग असणार आहे. एकूण मार्गापैकी ७.२९ किलोमीटरचा मार्ग सीआरझेड भागातून जाणार आहे. त्यामुळे आता सीआरझेडची परवानगी घेण्याची तयारी केली आहे. या मार्गात सुमारे ४० टक्के सीआरझेडक्षेत्र बाधित होणार आहे. त्यामुळे ते कशी कुठे, कशा पद्धतीने बाधित होणार आहे, याचा आरखडा तयार करून येत्या दोन ते तीन दिवसांत एमसीझेडकडे मंजुरीसाठी पाठविणार आहे. ती मिळाल्यानंतर या मार्गाचे काम सुसाट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Kharegaon-Ghodbunder Coastal Road in sight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.