खारीगाव आरओबी जानेवारीपर्यंत खुला होणार, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली कामाची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 06:19 PM2020-08-17T18:19:35+5:302020-08-17T18:21:39+5:30
खारीगाव येथील रेल्वे फाटकामुळे येथे अनेकदा लोकल थांबवाव्या लागतात. तसेच, कमी वेगात लोकल चालवाव्या लागतात. याचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर होत असून गाड्या विलंबाने धावणे, तसेच लोकलच्या फेऱ्या वाढवता न येणे आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
ठाणे - कळवा आणि मुंब्रा दरम्यान ठाणे महापालिका आणि रेल्वे संयुक्तरित्या करत असलेल्या खारीगाव आरओबीचे काम जानेवारी २०२१ पर्यंत पूर्ण होऊन तो सेवेत दाखल होईल. त्यामुळे खारीगाव येथील रेल्वे फाटक बंद होऊन उपनगरी सेवेच्या किमान ५० फेऱ्या वाढवून प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर दिलासा देणे शक्य होईल, असा विश्वास कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.
खारीगाव येथील रेल्वे फाटकामुळे येथे अनेकदा लोकल थांबवाव्या लागतात. तसेच, कमी वेगात लोकल चालवाव्या लागतात. याचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर होत असून गाड्या विलंबाने धावणे, तसेच लोकलच्या फेऱ्या वाढवता न येणे आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे खारीगाव येथील हे फाटक बंद करून या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, प्रत्यक्ष कामाला वेग येत नव्हता. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी २०१४ मध्ये खासदार झाल्यानंतर या प्रकल्पासमोरील अडचणी दूर करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. उड्डाणपुलाच्या खारीगाव येथील बाजूस असलेल्या मैदानाचे या उड्डाणपुलामुळे दोन भागात विभाजन होत असल्यामुळे तेथील नागरिकांचा या प्रकल्पाला विरोध होता. तसेच, पलिकडील बाजूस मफतलाल कंपनीची जमीन असल्यामुळे तेथेही उड्डाणपुल उतरवण्यासंदर्भात अडचणी होत्या. त्यामुळे रेल्वेने त्यांच्या हद्दीतील कामाला सुरुवात केली तरी, ठाणे महापालिकेच्या वाट्याच्या कामाला म्हणावी तशी गती येत नव्हती.
त्यामुळे खा. डॉ. शिंदे यांनी रेल्वे प्रशासन, ठाणे महापालिका आणि स्थानिकांच्या वारंवार बैठका घेतल्या. उड्डाणपुलाच्या खारीगाव बाजूकडील आरेखनात बदल करून मैदान वाचवले. त्यामुळे स्थानिकांचा विरोध मावळला. तसेच, पलिकडील बाजूस लागणाऱ्या जमिनीसाठी ठाणे महापालिकेने ४० कोटी रुपयांचा मोबदला दिल्यामुळे तेथील प्रश्नही निकाली निघाला. सर्व अडचणी दूर झाल्यामुळे कामाला वेगाने सुरुवात झाली होती. परंतु, अचानक उद्भवलेल्या कोव्हिडच्या संकटामुळे पुन्हा कामाला खीळ बसली. कोव्हिडचे संकट आले नसते तर आतापर्यंत काम पूर्ण होऊन हा पूल सेवेत दाखल झाला असता.
मात्र, आता पुन्हा एकदा कामाला सुरुवात झाली असून खा. डॉ. शिंदे यांनी सोमवारी या कामाची पाहणी केली. पुलाचे ७३ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगाने पूर्ण होऊन जानेवारीपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी दिले. याप्रसंगी ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता पाफळकर, अन्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.