खत्री अपार्टमेंटमधील रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात ठामपा अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:47 AM2021-09-14T04:47:46+5:302021-09-14T04:47:46+5:30
ठाणे : कोविड आपत्तीमुळे गौरी-गणपतीच्या काळात रहिवाशांना गर्दी न करण्याचा सल्ला देणाऱ्या ठाणे महापालिकेने खत्री अपार्टमेंटमधील रहिवाशांची तात्पुरती ...
ठाणे : कोविड आपत्तीमुळे गौरी-गणपतीच्या काळात रहिवाशांना गर्दी न करण्याचा सल्ला देणाऱ्या ठाणे महापालिकेने खत्री अपार्टमेंटमधील रहिवाशांची तात्पुरती व्यवस्था मदरशात केली आहे. पावसाळ्यात कोसळणाऱ्या इमारतीतील रहिवाशांसाठी महापालिकेने तात्पुरती पर्यायी व्यवस्थाच केली नसल्याचा दावा भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केला. महापालिकेच्या ताब्यातील रेंटल हौसिंगच्या इमारतींमध्ये किती सदनिका उपलब्ध आहेत, असा सवालही त्यांनी केला.
राबोडी येथील खत्री अपार्टमेंट दुर्घटनेची जबाबदारी पोलीस व रहिवाशांवर ढकलून महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासन मोकळे होणार आहेत का, असा सवाल डावखरे यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ठाण्यातील रहिवाशांची नैतिक जबाबदारी महापालिकेवरच आहे. रहिवाशांच्या सुरक्षित निवाऱ्याच्या समस्येवर मार्ग काढण्याऐवजी केवळ नोटिसा बजाविण्यावर महापालिकेने समाधान मानू नये. त्याऐवजी रहिवाशांना विश्वासात घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली. इमारतीच्या दुरुस्तीचे १५ टक्के काम तातडीने पूर्ण करण्याचे पत्र स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या मे. सेंटर टेक यांनी रहिवाशांना दिले होते. त्यामुळे इमारतीची दुरुस्ती पूर्ण झाली नसल्याचे स्पष्ट होते. येथील रहिवाशांना तात्पुरते पर्यायी निवासस्थान देण्याबाबत महापालिकेने कार्यवाही करण्याची गरज होती. त्याबाबत महापालिका प्रशासन कमी पडल्याची टीका त्यांनी केली.
...........