रहिवाशांच्या दुर्लक्षामुळेच खत्रीची दुर्घटना : पालिकेने इमारत केली सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:40 AM2021-09-13T04:40:03+5:302021-09-13T04:40:03+5:30
ठाणे : राबोडी येथील खत्री अपार्टमेंटमधील रहिवाशांना वारंवार सूचना देऊन, तसेच इमारत धोकादायक घोषित करूनही रहिवाशांनी दुर्लक्ष केल्यामुळे रविवारी ...
ठाणे : राबोडी येथील खत्री अपार्टमेंटमधील रहिवाशांना वारंवार सूचना देऊन, तसेच इमारत धोकादायक घोषित करूनही रहिवाशांनी दुर्लक्ष केल्यामुळे रविवारी स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडल्याचा आरोप ठाणे महापालिकेने केला आहे. विशेष म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये दर्शविल्याप्रमाणे सी विंगने दुरुस्ती न केल्यामुळे रहिवाशांना या दुर्घटनेला सामोरे जावे लागले आहे.
खत्री इमारत धोकादायक म्हणून २०१८ मध्येच ठाणे महापालिकेने घोषित केली होती. रहिवाशांना स्ट्रक्चरल ऑडिटनुसार इमारतीमध्ये दुरुस्ती करण्याच्या सूचना नोटीसा बजावून केल्या होत्या. या इमारतीच्या ए आणि बी विंगमधील रहिवाशांनी स्ट्रक्चरल ऑडिटनुसार इमारतीमध्ये दुरुस्तीही केली होती. सी विंगच्या रहिवाशांनी मात्र स्ट्रक्चरल ऑडिटकडे आणि महापालिकेने इमारत रिक्त करण्याच्या नोटिसीकडेही दुर्लक्ष केले.
या घटनेनंतर तात्काळ ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार उपआयुक्त अशोक बुरपुल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी पथकाच्या माध्यमातून याठिकाणी कायदेशीर कारवाई करीत इमारत रिकामी करुन सील केली.
* या इमारतीची २०१३ मध्ये पाहणी करून ती धोकादायक इमारत म्हणून नोटिस बजावली होती. मुदतीनंतरही रहिवाशांनी ती रिक्त न केल्याने २६८ (५) अन्वये राबोडी पोलिसांकडे ती इमारत रिकामी करुन देण्याबाबत पालिकेने पत्र दिले होते.
* ही इमारत सी २- बी या अतिधोकादायक वर्गवारीत असल्याचा अहवाल स्ट्रक्चरल ऑडिटर मे. सेंटरटेक यांनी दिलेला असून, त्यामध्येही इमारतीची तातडीने दुरुस्ती करण्याचे सूचवले होते. इमारत तातडीने दुरुस्त करावी. तसे न केल्यास दुर्घटनेस महापालिका जबाबदार राहणार नाही, अशीही नोटीस बजावली होती. इमारत पूर्ण रिकामी करुन काम न केल्यामुळेच या दुर्घटनेला रहिवाशांना सामोरे जावे लागले.