खोणी ग्रामपंचायतीच्या ४८ कर्मचाऱ्यांची उपासमार, तीन महिने पगाराविना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 12:58 AM2019-10-01T00:58:07+5:302019-10-01T00:58:42+5:30
भिवंडी शहरालगत असलेल्या खोणी ग्रामपंचायतीतील ४८ कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून पगारच न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
भिवंडी : भिवंडी शहरालगत असलेल्या खोणी ग्रामपंचायतीतील ४८ कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून पगारच न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. शहापूर, दाभाड, भिवंडी या दूरवरच्या ठिकाणांहून हे कर्मचारी येत असल्याने प्रवासभाड्याचा खर्चही डोईजड झाला आहे. तसेच मुलांचा शैक्षणिक आणि घरगुती खर्च भागवण्यासाठी उसनवारी, व्याजाने पैसे घेऊ न दिवस ढकलावे लागत आहेत.
भिवंडी शहरालगत खोणी ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुमारे ८० हजार लोकसंख्या आहे. ग्रामपंचायतीत ३५ सफाई कामगार, पाणीपुरवठा विभागात चार कर्मचारी आणि नऊ लिपिक आहेत. मात्र, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि प्रशासन अधिकाºयांच्या नियोजनाअभावी या कर्मचाºयांचा जुलै ते सप्टेंबरचा पगार रखडला आहे. त्यामुळे गणेशोत्सव पगाराविना गेल्यानंतर दसरा-दिवाळीही अंधारात जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लेबर फ्रंट युनियनने सात दिवसांच्या आत ग्रामपंचायत प्रशासनाने कर्मचाºयांचे पगार न दिल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यासंबंधी लेबर फ्रंटचे अध्यक्ष अॅड. किरण चन्ने यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे.
पाच दिवसांत थकीत पगार देणार : परमार
खोणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाची काही दिवसांपूर्वी बदली झाली. तसेच ग्रामसेवकांनी विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलनही केले होते. त्यामुळे या कर्मचाºयांचा पगार थकला होता. नुकतीच माझी या ग्रामपंचायतीमध्ये नियुक्ती झाली आहे. पाच दिवसांच्या आत कर्मचाºयांना थकीत पगार देण्यात येईल, असे खोणी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एम.बी. परमार यांनी सांगितले.