खोपकर ते आव्हाड; राजकारणातील सूडचक्र

By संदीप प्रधान | Published: November 21, 2022 10:58 AM2022-11-21T10:58:18+5:302022-11-21T10:58:23+5:30

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना व एकनाथ शिंदे यांनी ‘उठाव’ करून भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प झटपट मार्गी लागत आहेत. नगरविकासाच्या निधीची गंगा दुथडी भरून वाहत आहे.

Khopkar to Awad; The cycle of revenge in politics | खोपकर ते आव्हाड; राजकारणातील सूडचक्र

खोपकर ते आव्हाड; राजकारणातील सूडचक्र

googlenewsNext

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक -

ठाणे ही सांस्कृतिक नगरी असली व येथे गाणे वाजविण्याच्या कार्यक्रमाला एकत्र येणारे राजकीय नेते परस्परांच्या गळ्यात गळे घालताना दिसत असले तरी ठाण्याचा राजकीय इतिहास हा काल रक्तरंजित होता व आजही हिंसक, सुडाचा आहे, हेच पुन्हा पुन्हा दिसत आहे. मते फुटल्याच्या संशयातून श्रीधर खोपकर यांची एकेकाळी ठाण्यात भररस्त्यात हत्या झाली होती. आता एखाद्याला राजकीय जीवनातून उठविण्याकरिता तलवार-चॉपर घेऊन मागे लागायची गरज नाही. विनयभंगाची केस पुरेशी आहे, हेच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणातून दिसून आले.

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना व एकनाथ शिंदे यांनी ‘उठाव’ करून भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प झटपट मार्गी लागत आहेत. नगरविकासाच्या निधीची गंगा दुथडी भरून वाहत आहे. अशाच पद्धतीने कळवा येथे उभारण्यात आलेल्या एका पुलाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे व आव्हाड हजर होते. व्यासपीठावर कानगोष्टी करून, परस्परांना टाळ्या देऊन त्यांनी फोटोग्राफरना क्लिकची संधी दिली. त्यानंतर गर्दीतून तरातरा बाहेर पडण्याची आव्हाड यांना इतकी घाई का झाली होती, ते कळायला मार्ग नाही. परंतु गर्दीतून वाट काढत असताना भाजपची पदाधिकारी असलेली एक महिला त्यांच्या मार्गात आडवी आली. आव्हाड यांनी तिच्या खांद्याला स्पर्श करून तिला बाजूला केले. लागलीच तिने त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतरचे रामायण साऱ्यांनाच ठाऊक आहे. तत्पूर्वी ‘हर हर महादेव’ या चुकीचा इतिहास दाखवत असल्याचा आरोप असलेला चित्रपट बंद पाडायला काल-परवापर्यंत मंत्रिपदावर असलेले आव्हाड स्वत: सरसावले. त्यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण झाल्याने त्याचे बालंट त्यांच्यावर आले.

आपल्यासमोरचा विरोधक किती प्रबळ आहे व तो कुठल्या थराला जाऊ शकतो, याचे भान राजकारणात यायला हवे व त्याचे भान राखून पावले उचलायला हवीत. ठाण्यात मागील विधानसभा निवडणुकीपूर्वीपर्यंत शिवसेना व राष्ट्रवादी हेच स्पर्धक किंवा शत्रू होते. महाविकास आघाडी सरकार आल्यावर जिल्ह्यातील राजकीय गणिते उलटी-पालटी झाली. आव्हाड आणि मातोश्री यांची जवळीक सत्तेच्या काळात बरीच वाढल्याची चर्चा आहे. काँग्रेस जिल्ह्यात चिमटीत येणार नाही इतकी आहे. भाजपची ताकद गेल्या आठ वर्षांत वाढली असली तरी ठाण्यात या पक्षाकडे आश्वासक चेहरा नाही. त्यामुळे भिवंडीतील कपिल पाटील यांना केंद्रात राज्यमंत्री करून पक्षाने ताकद दिली. असे असले तरी राजकारण शिंदे-आव्हाड या जोडगोळीभोवती फिरते. राज्यात भाजपबरोबर सत्ता असली तरी ठाणे जिल्ह्यात डोंबिवलीतील रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामापासून अंबरनाथच्या गोळीबारात बाळासाहेबांची शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष वाढताना दिसतोय.

जिल्ह्यात भाजप वाढला तर आपली डोकेदुखी वाढेल, याची शिंदे यांनाही जाणीव आहे. त्यामुळे आव्हाड यांच्यावर हल्ले झाल्याने ठाण्यातील राजकीय पटलावरून भाजप हद्दपार होऊन बाळासाहेबांची शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होण्याची शक्यता काहींना यात वाटते.
दुसरीकडे मातोश्रीसोबत आव्हाडांची जवळीक ही भविष्यात डोकेदुखी ठरू नये याकरिता सत्ताधारी पक्षांनी सहमतीने केलेली ही खेळी असल्याचे काहींचे म्हणणे आहे. राजकारण पुढे जात नाही तोपर्यंत या घटनांचे कंगोरे उलगडणार नाहीत. पण ठाण्यातील राजकारणातील विखार तसुभर कमी झालेला नाही, हेच खरे.

 

Web Title: Khopkar to Awad; The cycle of revenge in politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.