खुदा का घर सब के लिए खुला...!, कल्याणमध्ये मशीद परिचय उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 02:54 AM2019-02-11T02:54:35+5:302019-02-11T02:55:13+5:30
मुस्लिम धर्माचे प्रार्थनाघर म्हणजे मशीद. या मशिदीमध्ये अन्य धर्मीयांना प्रवेश नसतो. त्यामुळे या मशिदीत नेमके काय चालते, याचा परिचय करून देण्यासाठी जमात-ए-इस्लामी-हिंद यांच्या पुढाकाराने रविवारी कल्याणच्या जामा मशिदीचे दर्शन अन्य धर्मीयांना घडवण्यात आले.
कल्याण : मुस्लिम धर्माचे प्रार्थनाघर म्हणजे मशीद. या मशिदीमध्ये अन्य धर्मीयांना प्रवेश नसतो. त्यामुळे या मशिदीत नेमके काय चालते, याचा परिचय करून देण्यासाठी जमात-ए-इस्लामी-हिंद यांच्या पुढाकाराने रविवारी कल्याणच्या जामा मशिदीचे दर्शन अन्य धर्मीयांना घडवण्यात आले. या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खुदा का घर आज सबके लिए खुला था, अशीच भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाची वेळ साडेचार वाजताची होती. कार्यक्रमापूर्वी किती लोक मशिदीच्या दर्शनासाठी येतील, याविषयी साशंकता होती. अनेक मुस्लिमबांधव आधीच आले होते. दूधनाका परिसरातील जामा मशीद ही १६८ वर्षे जुनी आहे. ती पाहण्यासाठी अन्य धर्मांचे लोक हळूहळू जमू लागले. यावेळी अकील शेख यांनी उपस्थितांना गटागटांनी माहिती दिली. आत प्रवेश केल्यावर हातपाय धुऊन नमाजपठणापूर्वी स्वच्छता बाळगली जाते, त्यास वजू म्हटले जाते. त्याकरिता पाण्याचा हौद बांधण्यात आला आहे. त्यात मासेही आहेत. त्यानंतर, मशिदीच्या आतल्या भागात महिरपीसमोर नमाजपठण केले जाते. नमाजपठण काबाच्या दिशेने केले जाते. नमाजपठण सूर्योदयापूर्वी, दुपारी, सूर्यास्तापूर्वी, सूर्यास्तनंतर व झोपण्यापूर्वी असे पाच वेळा केले जाते. मशिदीमध्ये त्याच्या वेळा नमूद केलेल्या असतात. शुक्रवारी दुपारच्या नमाजानंतर मशिदीतील मौलाना १५ मिनिटांचे प्रवचन देतात. त्यात प्रथम अल्लाची महती विशद केली जाते. त्यानंतर, आसपासच्या समस्यांवर भर दिला जातो. नमाजपठण सामूहिक व वैयक्तिकस्वरूपात केले जाते. हे सगळे अन्य धर्मीयांनी शेख यांच्याकडून समजून घेतले. त्यानंतर, मुस्लिम धर्माचे विचारवंत वाजिद अली खान यांच्या उपस्थितीत उपक्रमाविषयी माहिती दिली गेली. हा उपक्रम देशभरात सुरू आहे. यापूर्वी औरंगाबाद, मुंब्रा, पुणे येथे हा उपक्रम घेण्यात आला. कल्याणमध्ये त्याची सुरुवात प्रथमच होत आहे. मशिदीमध्ये काय होते, त्याची माहिती देणे, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाचे आयोजक मोईन डोण यांच्यासह जामा मशिदीचे मौलाना जोहेर डोण व मुस्लिम जमात मशीद संघटनेचे प्रमुख व जामा मशिदीचे व्यवस्थापन पाहणारे शरफुद्दीन कर्ते यावेळी उपस्थित होते.
अपप्रवृत्तींना चोख उत्तर
काही विघातक प्रवृत्ती इस्लामविषयी जाणीवपूर्वक द्वेष व गैरसमज पसरवत आहेत. त्यांना मशीददर्शन हा उपक्रम एक प्रकारचे चोख प्रत्युत्तर आहे. मशिदीद्वारे अनेक सामाजिक कामे केली जातात. त्याचा प्रचार व प्रसार केला जात नाही. ज्येष्ठ वकील फैजल काजी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. खान यांच्या व्याख्यानापश्चात सायंकाळचे नमाजपठण कसे केले जाते, याचेही दर्शन अन्य धर्मीयांना घडले. त्यापश्चात अन्य धर्मीयांनी खान यांना काही प्रश्न विचारले. त्याचेही समाधान खान यांनी चांगल्या प्रकारे केले.
देशात स्फोटक वातावरण असताना मशिदीविषयी असलेला गैरसमज दूर करण्यासाठी मशीद परिचय हा उपक्रम नक्कीच प्रशंसनीय आहे. आयोजकांनी त्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.
- डॉ. गिरीश लटके, साहित्यिक