ज्येष्ठ नागरिकदिनीच ज्येष्ठांची कुचेष्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 04:34 AM2018-10-02T04:34:29+5:302018-10-02T04:34:50+5:30
केडीएमसी वर्धापन दिन : ढिसाळ नियोजनाचा ज्येष्ठांना फटका, नगरसेविकांनी केली आयोजकांवर टीका
कल्याण : ढिसाळ नियोजनामुळे अर्धा तास उशिराने सुरू झालेला सोहळा, त्यात मान्यवरांची लांबलेली भाषणे आणि त्यानंतर सुरू झालेला कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, यामुळे ज्येष्ठ नागरिकांची सोमवारी चांगलीच परवड झाली. ज्येष्ठ नागरिकदिनीच कुचेष्टा झाल्याने केडीएमसीच्या वर्धापन दिनावर त्यांनी चांगलीच टीका केली.
केडीएमसीचा वर्धापन दिन व जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधत आचार्य अत्रे रंगमंदिराचा पुनर्लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सकाळी १०.३० ची वेळ असल्याने १० वाजल्यापासूनच ज्येष्ठ नागरिकांनी सभागृहात उपस्थिती लावली होती. ११ वाजण्याच्या सुमारास कार्यक्रमाला प्रारंभ झाला. सुरुवातीला अत्रे रंगमंदिर पुनर्लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. यात प्रामुख्याने विशेष अतिथी असलेले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर विनीता राणे, आयुक्त गोविंद बोडके, स्थायी समिती सभापती राहुल दामले आणि शहरअभियंता प्रमोद कुलकर्णी यांची भाषणे झाली. त्यांची मनोगते लांबल्यानंतर तीन ते चार तास ताटकळत बसलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करत महापालिका कर्मचाºयांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. अखेर, ज्येष्ठांची सहनशीलता संपली आणि त्यांनी थेट आयोजकांना ज्येष्ठांची चेष्टा लावली आहे का, असे बोल सुनावले. ज्येष्ठांची झालेली परवड पाहता काही नगरसेविकांनीही आयोजकांवर तोंडसुख घेतले.
वर्धापनदिनी महापालिकेत शुकशुकाट : वर्धापनदिनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले असले, तरी काही कर्मचारी आणि अधिकाºयांनी या संधीचा पुरेपूर फायदा उठवत दुपारीच घरी जाणे पसंत केले. त्यामुळे दुपारच्या सुमारास मुख्यालयातील अनेक विभागांमध्ये शुकशुकाट होता.
प्रोटोकॉल न पाळल्याने विरोधी पक्षनेते नाराज
प्रोटोकॉल न पाळल्याने विरोधी पक्षनेते मंदार हळबे हे कार्यक्रमस्थळीच संतापले. प्रशासनाचा निषेध करत त्यांनी थेट रंगमंदिरच सोडले.
आमंत्रणपत्रिका नसताना मी तिथे गेलो होतो, परंतु सूत्रसंचालन करणाºयांकडून आमच्या नावाचा साधा उल्लेखही केला जात नव्हता.
शहरअभियंता आणि अन्य पदाधिकाºयांची भाषणे झाली असताना महापालिकेचा महत्त्वाचा पदाधिकारी म्हणून मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळायला हवी होती. परंतु, तीही देण्यात आली नाही, असे त्यांनी सांगितले.
कलावंतांचा पडला विसर : रंगमंदिराच्या चाचणी कार्यक्र मात अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कल्याण शाखेच्या पुढाकाराने कलाकारांनी विविध कला सादर केल्या होत्या. परंतु, पुनर्लोकार्पणाच्या कार्यक्रमाचे नाट्य परिषदेच्या पदाधिकाºयांसह शहरातील स्थानिक कलावंतांना निमंत्रण नव्हते. याबाबत, काही कलावंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, नाट्य परिषद, कल्याण शाखा कार्यवाहक रवींद्र सावंत यांच्याशी संपर्क साधला असता आम्हाला निमंत्रण नव्हते, असे सांगितले.