मुलीची छेड काढल्याचा आरोप करीत अपहरण करुन तरुणाला लुबाडले; तिघांना अटक
By जितेंद्र कालेकर | Updated: November 24, 2023 21:14 IST2023-11-24T21:14:32+5:302023-11-24T21:14:49+5:30
वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब निकुंभ यांच्या पथकाने २३ नोव्हेंबर रोजी अशरफ याच्यासह तिघांना अटक केली.

मुलीची छेड काढल्याचा आरोप करीत अपहरण करुन तरुणाला लुबाडले; तिघांना अटक
ठाणे: मुलीची छेड काढल्याचा बनाव करीत सर्वेशकुमार पटेल (२७, रा. इंदिरानगर, ठाणे) या तरुणाचे चाकूच्या धाकावर अपहरण करीत लुटणाऱ्या अशरफ शेख (२२), जमीर उर्फ जवा नुरुल शेख (३४) आणि झाकीर शेख (२४) या तिघांना अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी शुक्रवारी दिली. त्यांच्याकडून रिक्षा आणि मोबाईल हस्तगत केला.
यातील तक्रारदार पटेल हे २० नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट भागातील गोपालाश्रम हॉटेलजवळून पायी जात होते. त्याचवेळी या तिघांनी आपसात संगनमत करुन ते एका रिक्षातून त्यांच्याकडे आले. ‘तू यहाँ लडकी को छेड रहा है’, असा आरोप करीत त्यांना जबरदस्तीने रिक्षात कोंबून चाकूचा धाक दाखवला. आरडाओरडा केला तर ठार मारण्याची धमकी देत त्यांना ठाण्याच्या रघुनाथनगर भागातील एलबीएस रोड, नितीन नाका आणि लुईसवाडी परिसरात फिरवले. त्यांच्याकडून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँक खात्यातून आधी आठ हजार रुपये आणि नंतर ४० हजार रुपये असे ४८ हजार रुपये ऑनलाइन यूपीआयद्वारे काढून घेतले. त्यानंतर त्यांचा मोबाईल हिसकावून रिक्षातून पळ काढला.
वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब निकुंभ यांच्या पथकाने २३ नोव्हेंबर रोजी अशरफ याच्यासह तिघांना अटक केली. या तिघांनाही २९ नोव्हेबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.