मुंबईतून अपहरण झालेल्या बाळाची नाशिक येथून सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 05:17 AM2019-04-16T05:17:56+5:302019-04-16T05:18:03+5:30
दोन महिन्यांच्या बाळाचे (मुलाचे) अपहरण करणाऱ्या नीलम बोरा (३४, रा. नाशिक) या महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने रविवारी दुपारी अटक केली.
ठाणे : मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस या रेल्वेस्थानकातून दोन महिन्यांच्या बाळाचे (मुलाचे) अपहरण करणाऱ्या नीलम बोरा (३४, रा. नाशिक) या महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने रविवारी दुपारी अटक केली. तिच्या तावडीतून या बाळाची सुखरूप सुटका केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी सोमवारी दिली.
मुंब्रा रेल्वेस्थानक परिसरातून सलमान खान या १० महिन्यांच्या बाळाचे ३ फेब्रुवारी २०१९ रोजी अपहरण झाले होते. मुंब्रा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. मुंब्रा पोलिसांसह ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ चे पथक या अपहरणाचा तपास करत असताना मुंब्रा ते सीएसटी आणि सीएसटी ते कसारा तसेच कर्जतपर्यंतच्या सर्व सीसीटीव्हींची पडताळणी केली.
मार्च महिन्याच्या अखेरीस सीएसटी येथून दोन महिन्यांच्या बाळाला उचलून नेणारी एक महिला सीसीटीव्हीत कैद झाल्याचे ठाणे पोलिसांच्या निदर्शनास आले. सलमानच्या तपासालाही यातूनच वेग मिळाला. सलमानला उचलून नेणाºया महिलेची देहयष्टी सीएसटीमधून बाळ चोरणाºया महिलेशी मिळतीजुळती होती. त्यामुळेच ती आणि मुंब्रा येथून सलमानचे अपहरण करणारी महिला एकच असल्याचा पोलिसांचा संशय होता. त्यानुसार, ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाला या महिलेचे सीसीटीव्हीतील छायाचित्र मिळाले. हेच छायाचित्र वेगवेगळ्या ठिकाणी प्रसिद्ध करू तिची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले. तसेच दादर ते आसनगाव, कल्याण ते कर्जतपर्यंत सुमारे २०० हून अधिक सीसीटीव्हींचीही पडताळणी करून तिचा कसून शोध घेण्यात आला. या प्रकरणाचा शोध सुरू असताना संबंधित संशयित महिला रामवाडी, पंचवटी भागातील असल्याचे समोर आले. या माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने १४ एप्रिल रोजी दुपारी २ वा.च्या सुमारास नाशिकमधील पंचवटीतील रामवाडी येथील श्रद्धा पार्क येथून नीलम बोरा हिला ताब्यात घेतले. तिच्याच ताब्यातून मुंबईतून अपहरण झालेल्या दोन महिन्यांच्या बाळाचीही सुखरूप सुटका केली. बोरा हिने २९ मार्च २०१९ रोजी या बाळाचे सीएसटी येथून अपहरण केल्याचे सांगून लग्नाला १० वर्षे उलटूनही अपत्य नसल्याने या बाळाची चोरी केल्याची कबुलीही तिने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. बाळ सुखरूप असून त्याला सोमवारी देवराज यांनी आईच्या ताब्यात दिले. तर, अपहरण करणाºया बोरा हिला पुढील कारवाईसाठी सीएसटी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
>एका मुलाचा शोध सुरूच
कोपरी येथून एका कचरा वेचणाºया महिलेच्या दीडवर्षीय मुलीचे अपहरण करणाºया महिलेस कोपरी पोलिसांनी तीन दिवसांपूर्वीच अटक केली आहे. तर, ४ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंब्रा रेल्वेस्थानकाच्या समोरून १० महिन्यांच्या सलमान खान या मुलाचे महिलेने अपहरण केले होते. या मुलाच्या अपहरण प्रकरणाच्या तपासातून या दोन महिन्यांच्या बाळाचा शोध लागला. मात्र, मुंब्य्रातील मुलाचा अद्यापही शोध लागला नसल्याने हा तपास अद्यापही सुरू आहे.