आईच्या कुशीतून अपहरण झालेला ' दादा ' सापडला; चार तासात गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश
By अजित मांडके | Published: October 12, 2024 04:00 PM2024-10-12T16:00:20+5:302024-10-12T16:07:08+5:30
ही कारवाई करत ठाणेनगर पोलिसांना हा गुन्हा ०४ तासात उघडकीस आणला आहे.
ठाणे : आईच्या कुशीत झोपी गेलेल्या ०५ महिन्याच्या " दादा " नामक बाळाचे अपहरण करणाऱ्या एका त्रिकुटाला ठाणे शहर पोलिसांनी अटक करत, त्या बाळाची सुखरूप सुटका केली. ही कारवाई करत ठाणेनगर पोलिसांना हा गुन्हा ०४ तासात उघडकीस आणला आहे. अटक केलेल्या त्रिकुटामध्ये दोन महिलांचा समावेश असून यातील जावेद न्हावी याच्याविरोधात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणेनगर, राबोडी आणि कळवा या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्या बाळाला त्याच्या आईच्या ताब्यात दिल्यावर त्या मातेचे डोळे पाणवले.
राबोडी परिसरातील जावेद अजमत अली न्हावी (३५), सुरेखा राजेश खंडागळे (३४) आणि क्रीक नाका येथील जयश्री याकूब नाईक (४५) असे अटक करण्यात आलेल्या त्रिकुटाने नाव आहे. ठाण्यातील जेल तलाव जवळील उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या वनिता पवार (३५) या शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे ०५ महिन्याच्या दादा नामक बाळाला घेऊन झोपी गेल्या होत्या. याचदरम्यान बाळ कुशीत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट ठाणे नगर पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीच्याआधारे अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत, ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथक स्थापन करून त्या बाळाला शोधण्यास सुरुवात झाली.
याचदरम्यान सीसीटीव्ही कॅमेरा आणि तांत्रिक माहितीच्या आधारे बाळाला नेणाऱ्यांची माहिती पुढे आल्यावर पोलिसांनी त्यांना अटक करत बाळाची सुटका केली. तसेच हा गुन्हा अवघ्या ०४ तासात उघडकीस आणला. तसेच त्या त्रिकुटाने नेमके कशासाठी बाळाचे अपहरण केली. ते तो बाळ कोणाला विकणार होते का ? किंवा या पूर्वी त्यांच्या अशाप्रकारे गुन्हे दाखल आहेत का ? यामध्ये आणखी कोणी साथीदार आहेत का? त्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाणेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिपक खेडकर, हेडकॉन्स्टेबल विक्रम शिंदे, गांगुर्डे, पोलीस हवालदार तानाजी अंबूरे, सागर पाटील, प्रकाश जाधव, पंकज दाभाडे, संदीप चव्हाण या पथकाने अवघ्या चार तासांमध्ये अपहरण झालेले ०५ महिन्याचे बाळ व त्या त्रिकुटाचा शोध घेऊन हा गुन्हा उघड आणण्यात यश आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत मारकड करत आहेत.