४ तासांच्या बाळाचे अपहरण, ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील घटना, मनसेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 03:04 AM2018-01-15T03:04:27+5:302018-01-15T03:04:31+5:30

अवघ्या चार तासांच्या बाळाचे विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयातून अपहरण झाल्याचा प्रकार रविवारी पहाटे घडला. बाळाची आई मोहिनी मोहन भोवर (१९, रा. भिवंडी) हिने या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली

Kidnapping of 4-hour child, incidents in Thane district civil hospital, MNS movement | ४ तासांच्या बाळाचे अपहरण, ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील घटना, मनसेचे आंदोलन

४ तासांच्या बाळाचे अपहरण, ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील घटना, मनसेचे आंदोलन

Next

ठाणे : अवघ्या चार तासांच्या बाळाचे विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयातून अपहरण झाल्याचा प्रकार रविवारी पहाटे घडला. बाळाची आई मोहिनी मोहन भोवर (१९, रा. भिवंडी) हिने या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, रुग्णालयाच्या या गलथान कारभाराविरुद्ध मनसेने जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करून या घटनेचा निषेध नोंदविला.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बाळाचे अपहरण करणाºया या महिलेचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. भिवंडीच्या आदिवासी पाड्यात वास्तव्यास असलेल्या मोहिनी यांना भिवंडीतील इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले होते. त्या वेळी तेथील रुग्णालय प्रशासनाने त्यांना ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले होते. शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तिला ठाण्याच्या रुग्णालयात दाखल केले. तिने रात्री ११ वाजण्याच्या सुमारास नैसर्गिक प्रसूतीने मुलाला जन्म दिला. रविवारी पहाटे ३.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास तिच्या आईने बाळाला मागितल्याचा बहाणा करून, एका अनोळखी महिलेने तिच्याकडून हे बाळ नेले. प्रत्यक्षात हे बाळ त्या महिलेने चोरल्याचे अर्ध्या तासाने तिच्या लक्षात आले. तिची आई आणि पती हे चहा पिण्यासाठी पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान बाहेर पडले. त्याच वेळी हा प्रकार घडला. काही वेळाने प्रसूती कक्षातील परिचारिका तिच्याकडे बाळाला दूध पाजून झाले का, अशी विचारणा करण्यासाठी गेली. तेव्हा बाळाला आईकडे बाहेर पाठविल्याचे तिने सांगितले. आपण बाळाला आणण्यासाठी कोणत्याही महिलेला पाठविले नसल्याचे तिने सांगितल्यानंतर, तत्काळ पोलिसांना आणि संबंधित डॉक्टरांना याबाबतची माहिती परिचारिकांनी दिली. पोलिसांनी रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून, चौकशी सुरू केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील यांनी दिली. या घटनेमुळे रुग्णालयीन सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी
बाळ चोरीला गेल्याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्यामुळे अज्ञात व्यक्तीऐवजी थेट जिल्हा शल्यचिकित्सकांवरच गुन्हा दाखल करावा, तातडीने सुरक्षारक्षक नेमावेत आदी मागण्यांसाठी मनसेचे ठाणे शहर उपाध्यक्ष रवींद्र मोरे, उपशहराध्यक्ष विश्वजित जाधव, पुष्कर विचारे, जावेद शेख, तसेच महेश कदम आणि आशिष डोके आदींनी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयाबाहेर रविवारी सकाळी ठिय्या आंदोलन करून, या घटनेचा निषेध नोंदविला. या कारभारात सुधारणा झाली नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही मनसेने दिला आहे.

Web Title: Kidnapping of 4-hour child, incidents in Thane district civil hospital, MNS movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.