हॉटेल चालत नसल्यामुळे ठाण्यात मालकिणीने केले आचाऱ्याचे अपहरण: दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 09:04 PM2018-05-06T21:04:35+5:302018-05-06T21:04:35+5:30
हॉटेल तोटयात जात असल्यामुळे कासारवडवलीतील ‘सखी किचन’च्या हॉटेल मालकिणीने चक्क पूर्वाश्रमीच्या आचा-याचेच अपहरण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली.
ठाणे : आचारी सोडून गेल्यानंतर हॉटेल चालत नसल्यामुळे संजू राणा (२२, रा. किंगकाँगनगर, ठाणे) या आचा-याचे अपहरण करणा-या अश्विनी हाडके या हॉटेलमालकिणीविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कृष्णकुमार पटेल (१९) आणि दीपू आदिवासी (२२, रा. दोघेही किंगकाँगनगर, ठाणे) या तिच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून अपहृत आचा-याची अवघ्या २४ तासांत सुटका केली आहे.
ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेट येथे असलेल्या ‘सखी किचन’ या अश्विनी यांच्या हॉटेलमध्ये संजू हा गेल्या दीड वर्षापासून आचारी म्हणून नोकरीला होता. त्यापोटी त्याला १५ हजार रुपये पगार दिला जायचा. त्याच्यासह त्याची पत्नी लक्ष्मी आणि मेहुणी पार्वती या दोघीही तिथे नोकरीला होत्या. काही कारणास्तव जेवणाची आॅर्डर रद्द झाली किंवा ते उशिरा कामावर आले की, संजूसह या तिघांचाही हॉटेलमालकीण अश्विनी पगारकपात करून दरमहिन्याला अवघा दोन ते तीन हजार रुपये पगार द्यायची. या सर्वच प्रकाराला कंटाळून संजूसह तिघांनीही १५ दिवसांपूर्वी तिच्याकडील काम सोडले. त्यानंतर, भूमी एकर येथील आर.बी. किचन यांच्या हॉटेलमध्ये तो आचारी म्हणून गेल्या १४ दिवसांपासून नोकरीला लागला. संजू यांनी काम सोडल्यानंतर हॉटेलवर परिणाम झाल्यामुळे अश्विनी यांचा मोठ्या प्रमाणात तोटा झाला. याच रागातून ४ मे २०१८ रोजी रात्री ९ वाजता आर.बी. किचनमध्ये असलेल्या संजूला अश्विनी हिने दमदाटी केली. कृष्णकुमार आणि दीपू या दोन मुलांच्या मदतीने तिने संजूला एका रिक्षामध्ये कोंबून त्याचे अपहरण केले. ‘तू हॉटेल सोडून गेल्यापासून माझे हॉटेल बंद झाले. तू माझ्या हॉटेलमध्ये काम केले नाही, तर मी तुला एखाद्या केसमध्ये फसवून टाकेल’, अशी धमकीही देऊन त्याला ब्रह्मांड भागात सोडले. त्यानंतर, पुन्हा आर.बी. किचनमधून त्याचे अश्विनीसह तिघांनी अपहरण करून रिक्षातून नेले. याप्रकरणी संजूची पत्नी लक्ष्मी हिने कासारवडवली पोलीस ठाण्यात पतीचे अश्विनीसह तिघांनी अपहरण केल्याची तक्रार दाखल केली.
ही तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता ढोले, निरीक्षक नासीर कुलकर्णी आणि उपनिरीक्षक एम.के. पोटे यांच्या पथकाने ५ मे रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास संजूची सुटका केली. लक्ष्मीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अश्विनीकडे संजूची चौकशी केल्यानंतर तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. संजू त्याचा गाववाला शंकर याच्याकडे गेल्याची माहिती देऊन पोलिसांची तिने दिशाभूल केली. नंतर, डोंगरीपाडा भागातून कृष्णकुमार आणि दीपू यांच्या ताब्यातून पोलिसांनी संजूची सुखरूप सुटका केली. यातील मुख्य सूत्रधार अश्विनीलाही लवकरच अटक केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढोले यांनी सांगितले.