मिठाईत विष कालवून शेकडोंना मारतो, अन्यथा खंडणी दे! हलवायाला धमकी देणाऱ्या दोघांना अटक
By जितेंद्र कालेकर | Published: September 10, 2024 12:11 AM2024-09-10T00:11:24+5:302024-09-10T00:11:36+5:30
मिठाईवाल्याने खंडणी दिली नाही तर त्याच्या मिठाईत विष कालवून ती वाटून शेकडाे लोकांना ठार करण्याचीही धमकी या दोघांनी दिली होती.
ठाणे : कोपरीतील मिठाई व्यापाऱ्याला ठार मारण्याची धमकी देत ५० हजारांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या विशाल ऊर्फ बाळासाहेब भोसले (४०) आणि कडुबा महादू तेलुरे (६०) या दोघांना कोपरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक लाख ८० हजार ३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित डेरे यांनी सोमवारी दिली. मिठाईवाल्याने खंडणी दिली नाही तर त्याच्या मिठाईत विष कालवून ती वाटून शेकडाे लोकांना ठार करण्याचीही धमकी या दोघांनी दिली होती.
विशाल याने तक्रारदार मिठाई व्यापाऱ्याला ६ ते ८ सप्टेंबर २०२४ दरम्यान मोबाइलवर फोन करून ५० हजारांच्या खंडणीची मागणी केली. तू मला ५० हजार रुपये दिले नाहीतर तुझ्या दुकानातून मिठाई खरेदी करून ती सुमारे पाचशे ते एक हजार लोकांना खाऊ घालून मारून टाकेन, अशी धमकी दिली. ठाण्यात चालणाऱ्या गँग माझ्याच भरोशावर चालतात. तू ५० हजार रुपये दिले तर तुझ्या जिवाला धोका नाही. पन्नास हजार रुपये दिले नाहीतर तुझ्या जिवाला धोका असल्याचीही धमकी त्यांनी दिली. यातील आरोपी विशाल हा २०१९ ते २०२३ पर्यंत कोपरी येथील व्यापाऱ्यांकडून वेगवेगळ्या वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसूल करायचा. व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार पैसे स्वीकारताना कळव्यातील कडूबा याला आणि मागणी करणाऱ्या कोपरीमधील विशाल अशा दोघांना सापळा रचून पोलिसांनी ८ सप्टेंबर २०२४ रोजी ताब्यात घेतले. विशाल आपण समाजसेवक असल्याचाही दावा करताे. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र कुमार पानसरे हे अधिक तपास करीत आहेत.
तर व्यापाऱ्यांनी तक्रार करावी-
या खंडणीबहाद्दरांनी अनेक व्यापाऱ्यांकडे खंडणी मागितल्याच्या तक्रारी आता उघड होत आहेत. ज्या व्यापाऱ्यांकडे या दोघांनी खंडणीची मागणी केली, त्यांनी कोपरी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन डेरे यांनी केले.