धक्कादायक! बाईकवर बसवून नेला मृतदेह, ठाण्यात मित्राने केली मित्राची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 06:42 PM2017-11-21T18:42:27+5:302017-11-21T18:48:53+5:30
अन्य कुठल्याही नात्यापेक्षा मैत्रीच्या नात्यात जास्त प्रेम, जिव्हाळा, आपुलकी असते. कारण मैत्रीच्या नात्यात आपण स्वत:ला मुक्तपणे व्यक्त करतो.
कल्याण - अन्य कुठल्याही नात्यापेक्षा मैत्रीच्या नात्यात जास्त प्रेम, जिव्हाळा, आपुलकी असते. कारण मैत्रीच्या नात्यात आपण स्वत:ला मुक्तपणे व्यक्त करतो. जे आपण कुटुंबियांजवळ बोलत नाही त्या गोष्टी आपण मित्राला सांगतो. पण काही वेळा आयुष्यात असे मित्र भेटतात कि, शत्रूची गरजच पडत नाही. अंबरनाथ वडवलीमध्ये रहाणा-या दोन युवकांनी अशाच प्रकारे फसवून आपल्या मित्राची हत्या केली.
गोकुळ परदेशी आणि प्रमोद राजपूत या दोघांनी मयुर डोळसे या आपल्या मित्राला रात्रीच्या जेवणासाठी बोलावले. गोकुळ आणि प्रमोदने जेवणामधून झोपेच्या गोळया देऊन मयुरला बेशुद्ध केले व त्याची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर दोघांनी मयुरचा मृतदेह बाईकवर ठेवला. त्यांनी मुयरच्या मृतदेहाला दोघांच्यामध्ये अशा पद्धतीने बसवले कि, पाहणा-याला कुठलाही संशय येणार नाही. तिघेजण बाईकवरुन चालले आहेत असे पाहणा-याला वाटावे. रात्रीच्यावेळी त्यांनी जवळपास सहा किलोमीटरपर्यंत बाईक चालवली व गर्द झाडीत मृतदेह फेकून दिला.
त्यांनी मयुरची कुटुंबाकडून 25 लाख रुपये खंडणी उकळण्याचा प्लान केला होता. मयुरची हत्या केल्यानंतर दोघेही घाबरले व खंडणी उकळण्याचा प्लान त्यांनी रद्द केला. 11 नोव्हेंबरला मयुरच्या कुटुंबियांनी कोळसेवाडी पोलीस स्थानकात तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. 10 नोव्हेंबरला खडकपाडा पोलिसांना वडवली गावात झुडूपांमध्ये एक मृतदेह सापडला होता. पोलीस स्टेशनमधल्या समन्वयामुळे दुस-याच दिवशी 11 नोव्हेंबरला तो मृतदेह मयुरचाच असल्याचे कोळसेवाडी पोलिसांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी मयुरच्या मोबाईल कॉल्सचे डिटेल्स तपासल्यानंतर त्याचे शेवटचे बोलणे एका मुलीबरोबर झाले होते. पोलिसांनी तिची चौकशी केल्यानंतर तिने मयुरने गोकुळ परदेशी आणि प्रमोद राजपूत या मित्रांना भेटण्यासाठी जात असल्याचे तिला सांगितले होते. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.