शिवी दिल्याच्या गैरसमजुतीतून चाकूने खुनी हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:42 AM2021-07-27T04:42:12+5:302021-07-27T04:42:12+5:30
ठाणे : शिवी दिल्याच्या गैरसमजुतीतून लोकमान्यनगर येथील निलेश मोरे (३६) यांच्यावर चाकूने खुनी हल्ला करणाऱ्या महेश उर्फ मारी सोनकवडे ...
ठाणे : शिवी दिल्याच्या गैरसमजुतीतून लोकमान्यनगर येथील निलेश मोरे (३६) यांच्यावर चाकूने खुनी हल्ला करणाऱ्या महेश उर्फ मारी सोनकवडे (२५, रा. लोकमान्य नगर) आणि शिवकुमार गुप्ता (२१, रा. लोकमान्य नगर, ठाणे) या दोघांनाही सोमवारी पहाटेच्या सुमारास वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. त्यांना २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
मोरे आणि त्यांचा मित्र अरविंद उतेकर असे दोघेजण २५ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास लोकमान्य नगर पाडा क्रमांक चार येथील रस्त्याच्या कडेला उभे राहून मोबाईलवरील गेम खेळत होते. त्याचवेळी त्यांच्या ओळखीचे महेश सोनकवडे आणि शिवकुमार हे रिक्षाने तिथून जात होते. दरम्यान, महेश आणि मोरे यांच्या भावाबरोबर दोन वर्षांपूर्वी भांडण झाल्याच्या रागातून तसेच मोरे यांनी त्यांच्या पत्नीला दिलेली शिवी ही आपल्यालाच दिल्याचा समज महेश आणि शिवकुमार यांनी केला. त्यामुळेच महेशने मोरे यांच्या कमरेवर चाकूने वार करून तिघून गेले. त्यानंतर त्यांनी त्यांची रिक्षा ही विश्वकर्मा मंदिराच्या गेटवर थांबवून पुन्हा मोरे यांच्याकडे येऊन शिवीगाळ करून त्यांना चाकूने मानेजवळ, खांद्यावर तसेच डोक्यावर भोसकून खुनी हल्ला केला. त्याचवेळी मोरे यांना वाचविण्यासाठी पुढे सरसावलेले त्यांचे मित्र संकेत जाधव यांच्याही उजव्या हातावर चाकूने वार केले. तर शिवकुमार याने बघून घेतो, घरात शिरुन मारून टाकू, अशी मोरे यांना धमकी देऊन पळून गेले. या हल्ल्यानंतर मोरे यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन ढोले यांच्या पथकाने महेश आणि शिवकुमार या दोघांनाही अटक केली.