खुनी, दरोडेखोरांच्या टोळक्याला अटक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 03:24 AM2019-07-25T03:24:47+5:302019-07-25T03:24:55+5:30

ठाणे पोलिसांची कारवाई : १९ घरफोड्या, एक खुनाचा गुन्हा उघडकीस

Killer, gang of robbers arrested! | खुनी, दरोडेखोरांच्या टोळक्याला अटक!

खुनी, दरोडेखोरांच्या टोळक्याला अटक!

Next

ठाणे : खून आणि दरोड्याचा आरोप असलेल्या सहा जणांच्या टोळक्याला ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली. लुटीतील रोकड, हत्यारे, मोटारसायकल आणि कार असा पाच लाखांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केला असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

१९ जुलै, २०१९ रोजी शहापूर तालुक्यातील शेलवली खंडोबाची या गावातील ओम बंगल्यात शिरकाव करून, दरोडेखोरांनी सुरेश नुजाजे (४८) यांचे हातपाय बांधून हत्याराने प्रहार करून खून केला होता. त्याच वेळी बंगल्यातील रोकड, सोन्याचांदीच्या दागिन्यांची त्यांनी लूट करून पलायन केले होते. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात खून आणि दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता.

तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या बातमीच्या आधारे पोलिसांनी भिवंडीतील अंबाडीनाक्याजवळील एका पडीक इमारतीमधून या सहा दरोडेखोरांना अटक केली. चमन चौहान (२५, रा. उत्तर प्रदेश), अनिल साळुंके (३२ रा. अहमदनगर), संतोष साळुंके उर्फ डॉली (३५, रा. जालना), रोहित पिंपळे (१९), बाबुभाई चव्हाण (१८, उत्तर प्रदेश) आणि रोशन खरे (३०, उत्तर प्रदेश) अशी दरोडेखोरांची नावे असून, गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर २२ जुलै रोजी त्यांना अटक करण्यात आली.

दिवसा फुगे किंवा अन्य वस्तूंची विक्री करण्याच्या बहाण्याने, ती ओसाड भागातील बंगल्यांची रेकी करून रात्री बंगल्यांमध्ये घरफोडी करून पसार होत असे. १९ जुलै रोजी एका कार आणि मोटारसायकलवरून येऊन त्यांनी ओम बंगल्याजवळ रेकी केल्याचे तपासात उघड झाले.

ठाणे-पालघरमध्येही गुन्हे नोंद
ओम बंगल्यात चोरी केल्यानंतर या लुटारूंनी त्याच परिसरातील आणखीही दोन बंगल्यांमध्ये चोरी केली होती, शिवाय ठाणे ग्रामीण आणि पालघर या दोन जिल्ह्यांमध्ये या टोळक्याने १९ चोऱ्या आणि एक खून केल्याचेही उघड झाले आहे. शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव हे या प्रकरणी अधिक तपास करीत असून, यातील सर्व आरोपींना २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Killer, gang of robbers arrested!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस