हत्येची सुपारी मंचेकर, साटमकडून
By admin | Published: January 19, 2016 02:11 AM2016-01-19T02:11:37+5:302016-01-19T02:11:37+5:30
बाळाराम म्हात्रे यांच्या खुनाची सुपारी सुरेश मंचेकर आणि गुरु साटम यांच्याकडून मिळाल्याची कबूली या प्रकरणात अटक केलेल्या उदयभान सिंग याने दिली आहे.
जितेंद्र कालेकर, ठाणे
बाळाराम म्हात्रे यांच्या खुनाची सुपारी सुरेश मंचेकर आणि गुरु साटम यांच्याकडून मिळाल्याची कबूली या प्रकरणात अटक केलेल्या उदयभान सिंग याने दिली आहे. मात्र, मंचेकरला या खूनाची सुपारी कोणी दिली, याचा शोध अद्याप सुरु आहे. दरम्यान, याच प्रकरणात पूर्वी अटक झालेले विद्यमान आमदार सुभाष भोईर आणि शरद भगत यांना पुन्हा चौकशीसाठी पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
साबागाव, दिवा येथे बाळाराम यांची १९९० मध्ये हत्या करण्यासाठी सुरेश मंचेकर आणि गुरु साटम यांनीच सुपारी दिली होती, अशी माहिती उदयभानने पोलिसांना दिली आहे. त्यापोटी दोघांना साडेतीन लाख रुपये देण्याचे ठरले होते. चौबेला त्यातील दोन लाख तर उदयभानला दीड लाख रुपये मंचेकरने दिले होते. आंबिवलीच्या एका झोपडपट्टीमध्ये मंचेकरने या दोघांना बोलविले होते. तिथेच ही सुपारी देण्यात आली. उत्तरप्रदेशमधील विविध पोलीस ठाण्यांच्या परिसरात खुनाचे दोन आणि इतर गंभीर स्वरुपाचे अशा २१ गुन्हयांची नोंद असलेला उदयभान हा गुरु साटमचा लहानपणीचा मित्र आहे. साटम कारागृहात असतानाही ते एकमेकांच्या संपर्कात होते. साटम आणि मंचेकर हे एकाच टोळीतले. त्यामुळे या दोघांकडे बाळाराम यांना मारण्याची ‘सुपारी’ आली. त्यांनी ती उदयभान आणि त्याच्या साथीदारांना दिली. मंचेकरने त्यासाठी रिव्हॉल्व्हरही आणून दिले. ठरल्याप्रमाणे उदयभानने आपल्या साथीदारांसह बाळारामचा खून केला. त्यानंतर तो पसार झाला.
मंचेकर टोळीचा वावर हा कल्याण-डोंबिवली परिसरातील असला तरी त्या टोळीने बांधकाम व्यवसाय, जमिनीची खरेदी-विक्री यातील व्यवसायांतूनही खंडणी मागितली होती. मंचेकर मारला गेल्यानंतर त्याची टोळी संपली असे जरी सांगितले जात असले तरी त्यांच्या टोळीचे सदस्य फुटले आणि वेगवेगळ््या मार्गाने त्यांनी इतर टोळ््यांचा आसरा घेतल्याचे सांगितले जाते. त्यातील काही सदस्य नंतरच्या काळातही या खून प्रकरणाशी संबंधित व्यक्तींच्या संपर्कात होते का याचा तपासही पोलिसांनी सुरू केला आहे.
म्हात्रे प्रकरणाची फाइल उघडल्यानंतर जसा त्यातील स्थानिक टोळीयुद्धाचा वाद समोर आला, जमिनीचे वाद पुढे आले तशीच मंचेकरसह इतर टोळ््यांच्या सहभागाची माहितीही पुढे आल्याने यातून कोणकोणती कारस्थाने पुढे येतील याचा अंदाज बांधताना तपास अधिकारीही चक्रावले आहेत.