राजा, प्रजेच्या खानपान सेवेत तफावत; नगरसेवक-अधिकाऱ्यांसाठी १५० रुपयांची थाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:40 AM2020-07-25T00:40:25+5:302020-07-25T00:40:45+5:30
कोरोनाग्रस्तांना दोनवेळचे जेवण, नाश्ता, चहासाठी फक्त १५१ रुपये
- धीरज परब
मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेतील नगरसेवक आणि अधिकारी महासभा, समित्या यांच्या बैठकांना हजेरी लावतात, तेव्हा एकवेळच्या जेवणाच्या थाळीचा दर १५० रुपये असतो. मात्र, महापालिकेच्या कोविड रुग्णालयातील रुग्णांना दिले जाणारे दोन्ही वेळचे जेवण, नाश्ता, चहा-बिस्कीट यावर मिळून महापालिका १५१ रुपये खर्च करीत आहे. यावरून, लोकप्रतिनिधी आपल्या पोटाचा प्रश्न येतो, तेव्हा करदात्या जनतेच्या पैशांतून ऐश करतात. परंतु, नागरिकांना जेव्हा सुविधा द्यायची वेळ येते, तेव्हा हात आखडता घेतात, हेच सिद्ध झाले आहे.
अनागोंदी, दुर्लक्ष व पैसे देण्यास टाळाटाळ आदी कारणांनी कोविड रुग्णालये, कोविड केअर व अलगीकरण कक्षांतील शेकडो कोरोनाग्रस्त नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे काम सुरू असल्याचे भयाण वास्तव निदर्शनास आले आहे. मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदरच्या पं. भीमसेन जोशी रुग्णालयात कोरोनाची लागण झालेल्यांना उपचारासाठी दाखल केलेले आहे. तेथील रुग्णांना आ. गीता जैन यांच्या माध्यमातून विनामूल्य जेवण, नाश्ता आदी पुरवले जायचे. हे जेवण, नाश्ता डॉक्टर व आहारतज्ज्ञांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे बनवून दिले जायचे. त्यासाठी जवळच्याच हॉटेलच्या भागीदारांनी स्वत:चे किचन, कर्मचारी उपलब्ध केले.
सामाजिक भावनेने हे कार्य सुरू असताना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पालिकेने स्वखर्चातून ही सुविधा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर हॉटेलच्या चालकांना पैसे अदा करून जेवण पुरवा, असे सांगण्यात आले. जूनपासून दर ठरवून रुग्णांना जेवण पुरवण्याचे काम केले जात असताना पालिकेकडून मात्र बिलाची रक्कम अदा करण्यात चालढकल सुरू झाली. मोफत किती पुरवणार म्हणून शेवटी एक दिवस रुग्णांना सकाळचा नाश्ता देणे अशक्य झाले. परंतु, नगरसेवक व पालिका अधिकाऱ्यांना याचे काही सोयरसुतक नाही.
भार्इंदर येथेच पालिकेने सुरू केलेल्या अलगीकरण कक्षातील नागरिकांना सुरुवातीच्या महिनाभर ‘फाइट फॉर राइट’चे राजू विश्वकर्मा आणि सहकाºयांनी मोफत जेवण, नाश्ता पुरवला.
परंतु, वाढत्या रुग्णसंख्येमुळे संस्थेने असमर्थता दर्शवल्यावर पालिकेने संस्थेच्या पदाधिकाºयांना बोलावून काम बंद करू नका, पालिका पैसे देईल, असे सांगितले. त्यानुसार, १५ मेनंतर ‘जीवन ज्योत’ संस्थेमार्फत अलगीकरण केंद्र व नंतर कोविड केअर केंद्र येथील रुग्ण व क्वारंटाइन लोकांना जेवण दिले जाऊ लागले. यासाठी दरमाणसी १५१ रुपये संस्थेला दिले जातात. तेही पंधरापंधरा दिवस मिळत नाहीत. या रकमेत दोनवेळचे जेवण, सकाळचा नाश्ता, चहा, सायंकाळी चहा बिस्किटे दिली जातात. एखाद्या रुग्णाने दूध मागितल्यास ते दिले जाते.
जेवण बनवण्यासाठी पालिकेने अलगीकरण कक्षाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर जागा दिली आहे. जेवण वितरणाची जबाबदारी स्वच्छतेसाठी नियुक्त ठेक्याचे कामगार करतात. अलगीकरण व कोविड केअरमध्ये जेवणाच्या तक्रारी जुलै महिन्यापासून अधिक आल्या. जेवण-नाश्ता वेळेवर मिळत नाही. अन्नाला चव नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत.
ताळमेळ नसल्याने गैरसोय
रोज किती रुग्ण व क्वारंटाइन लोक दाखल होणार व किती घरी जाणार, याचा ताळमेळ नसल्याने अचानक २००-३०० माणसे वाढली की, त्यांना जेवण बनवून देण्यास वेळ लागतो. पालिकेच्या अधिकाºयांनी लक्ष ठेवणे, जेवण-नाश्त्याची चव पाहणे आणि वितरणावर लक्ष देणे गरजेचे आहे. नगरसेवक-अधिकाºयांना महासभा, समित्यांच्या बैठकांवेळी एकवेळच्या थाळीकरिता महापालिका १५० रुपये खर्च करते. कोरोनाग्रस्त नागरिकांचे दोनवेळचे जेवण, नाश्ता, दोनवेळचा चहा, बिस्किटे यावर अवघे १५१ रुपये खर्च केले जात आहेत. राजा व प्रजा यांच्या खानपान सेवेतील ही तफावत हेच बेचव जेवणाचे मुख्य कारण आहे.