फळांचा राजा महागला, भाज्या आहेत स्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:36 AM2021-03-15T04:36:41+5:302021-03-15T04:36:41+5:30
ठाणे : उन्हाळा सुरू झाला की चाहूल लागते ती मधुर केशरी आंब्याची. सध्या या आंब्याचे भाव चढे आहेत. फळांमध्ये ...
ठाणे : उन्हाळा सुरू झाला की चाहूल लागते ती मधुर केशरी आंब्याची. सध्या या आंब्याचे भाव चढे आहेत. फळांमध्ये आंबा महाग असल्याचे फळविक्रेत्यांनी सांगितले. दुसरीकडे, गवार, काकडी सोडले तर इतर भाज्या मात्र स्वस्त आहेत. किराणाच्या वाढत्या भावाने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. डाळी, कडधान्य यांसह तेलाचे भाव चढेच आहेत, असे विक्रेत्यांनी सांगितले.
अनेक दिवसांपासून तेलाचे भाव वाढलेले आहेत. तेलाचे भाव खाली येत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आता तेल १० रुपयांनी महागले आहे. तेलाचे दर महागल्यामुळे इतर तेलयुक्त पदार्थांमध्येही वाढ दिसून येत आहे. तेलापाठोपाठ तूरडाळ, मूगडाळ, मसूर तसेच साखर, तर कडधान्यांमध्ये मटकी, चवळी, काबोली चणेही महागले आहेत. डाळी तर प्रत्येक किलोमागे दहा रुपयांनी तर कडधान्ये चक्क २० ते ३० रुपये प्रतिकिलोने महागली, तर शेंगदाणेही १५ रुपये प्रतिकिलोने महागले असल्याचे किराणा व्यापारी सचिन पाचंगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा सध्या १२०० रुपये डझन आहे. त्यामुळे अद्याप ग्राहकांची फारशी मागणी नसल्याचे फळविक्रेते दिनेश पाटील यांनी सांगितले. त्यापाठोपाठ पेर महाग आहे तर फळांमध्ये दुसरीकडे द्राक्ष आणि कलिंगडचे दर कमी आहेत, असे त्यांनी सांगितले. काकडी, गवारचे दर दुपटीने वाढले आहेत. फ्लाॅवर, कोबी दुसरीकडे स्वस्त आहेत. टोमॅटो सर्वाधिक स्वस्त आहे. फरसबी, वाटाण्याचे भाव सर्वसाधारण असल्याचे भाजीविक्रेते उमेश जयस्वाल यांनी सांगितले. किराणा मालामधील भाववाढीमुळे महिलांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. भाज्या एकीकडे स्वस्त असल्या तरी किराणा महाग असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
------------------------------------------------
किराणामध्ये स्वस्त काहीच झालेले नाही. मैदा, पोहे, रवा यांचे भाव आधीपासून वाढलेले असून ते आताही चढेच राहिले आहेत.
- सचिन पाचंगे, किराणा व्यापारी
द्राक्ष सध्या खूप स्वस्त आहेत. मालाला उठाव नसल्याने कमी दरात द्राक्ष विकली जात आहेत. आंबा सर्वांत महाग असल्याने सध्या फार ग्राहक ते घेत नाहीत.
- दिनेश पाटील, फळविक्रेता
उन्हाळ्यात भाज्यांची आवक भरपूर असते. त्यामुळे सध्या भाज्यांचे भाव सर्वसाधारण आहेत. फक्त एक-दोन भाज्या महाग आहेत.
- उमेश जयस्वाल, भाजीविक्रेता
-----------------------------------------------------------------
डाळी, कडधान्याची भाववाढ
तूरडाळ १०४-१०५ रुपये किलोवरून ११५ रुपये प्रतिकिलो, मूगडाळ ९८-१०० रुपये किलोवरून ११५ रुपये किलो, मसूरडाळ ८० रुपये किलोवरून ९० रुपये किलो, साखर ३४ रुपये किलोवरून ३९ रुपये किलो, तेल ११८ ते १३४ वरून १२८ ते १५८ प्रतिलीटर, बारीक मटकी ९० ते ९५ रुपये किलोवरून १२० रुपये किलो, बारीक चवळी १८० रुपये किलोवरून २१० रुपये किलो तर काबोली चणा ७५ ते ८० रुपये किलोवरून ११० रुपयांनी मिळत आहे.
आंबा महागला
आंबा १००० ते १२०० रु. डझन, पेर १५० ते १६० रुपयांवरून २०० ते २२० रु. किलो, द्राक्ष ७० ते ८० रु. किलोवरून ५० ते ६० रु. किलो, तर कलिंगड ३० रुपयांनी मिळत आहे. आंबा महागल्याने खवय्यांची पंचायत झाली आहे.
भाजीचे भाव
काकडी २० ते २२ रुपयांवरून ४० रुपये किलो, गवार ८० रुपये किलो, फ्लाॅवर, कोबी २० ते ३० रुपये किलो, वाटाणा ४० रुपये किलो, फरसबी ५० ते ६० रुपये, तर टोमॅटो ३० रुपयांना अडीच किलो मिळत आहेत.
----------------------------------------------------------------------