एमआयडीसी निवासी भागात रात्री अंधाराचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:48 AM2021-09-08T04:48:14+5:302021-09-08T04:48:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : एमआयडीसीतील निवासी भागातील पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती केडीएमसीकडून होत नसल्याने अनेक ठिकाणी दिवे बंद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : एमआयडीसीतील निवासी भागातील पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती केडीएमसीकडून होत नसल्याने अनेक ठिकाणी दिवे बंद आहेत. त्यामुळे रात्री रहिवाशांना अंधारातून वाट काढावी लागत आहे, तसेच वाहन चालकांना खड्डे दिसत नसल्याने वाहने आदळत आहेत.
निवासी भागातील काही पथदिव्यांच्या भोवती झाडांचा फांद्या आड येत आहेत, तर काही दिवे वाकलेले, तिरपे झाले असून, अपघाताची शक्यता आहे. काही ठिकाणी खांबांवरील दिवे गायब झाले आहेत. त्याचबरोबर, येथील रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी या पावसाळ्यात केडीएमसीने दोन ते तीन वेळा पॅच वर्क केले, परंतु जोराचा पाऊस पडल्यास त्यातील माती वाहून गेल्याने त्यावरील खर्च वाया गेला आहे. कमीतकमी गणेशोत्सवापूर्वी पथदिवे, रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.
पथदिवे लागत नसल्याचा तक्रारी रहिवाशांनी मनपा, लोकप्रतिनिधींकडे केल्या होत्या. मात्र, त्यानंतर प्रशासनातर्फे जुजबी दुरुस्ती केली होती. आता पुन्हा काही दिवसांतच दिवे बंद असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या आहेत.
केबल झाल्या जुन्या
- पथदिव्यांच्या भूमिगत असलेल्या केबल जुन्या झाल्या आहेत. त्यातच विविध कंपन्या व प्राधिकरणांकडून रस्त्याचे खोदकाम केले जात असल्याने पथदिव्यांच्या केबलची दुरवस्था झाली आहे. काही महिन्यांपूर्वी अनेक ठिकाणी नवीन खांब व एलईडी बल्ब बसविले होते.
-काही महत्त्वाचा रस्त्यांच्या नाक्यावर हायमास्ट दिवे लावले होते, परंतु त्यांचीही देखभाल व्यवस्थित होत नाही.
- बंद दिव्यांअभावी रस्त्यांवर काळोख पडत असल्याने, खड्डेमय रस्त्यावर रात्री फिरणे मुश्कील झाले आहे. त्यात महिला, ज्येष्ठ नागरिक यांचे चेन, मोबाइल लांबविण्याचे चोरीचा प्रकारात वाढत आहेत.
----------------