भिवंडीतील उड्डाणपुलांवर खड्डयांचे साम्राज्य; 7 कोटींची दुरुस्ती खड्ड्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 03:08 PM2021-09-14T15:08:53+5:302021-09-14T15:09:35+5:30
शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी म्हणून स्व राजीव गांधी उड्डाणपूल २००६ मध्ये उभारण्यात आला. विशेष म्हणजे हा उड्डाणपूल सुरुवातीपासूनच कमकुवत असून, तीन वर्षांपासून अवजड वाहनांसाठी तो बंद केला आहे.
नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण नाका ते वंजारपट्टीनाक्यावरील स्व. राजीव गांधी उड्डाणंपुलावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी या पुलाच्या दुरुस्तीवर लाखों रुपयांचा निधी खर्च करूनही पावसाळ्यात या उड्डाणपुलावर खड्डयांचे साम्राज्य पसरले असल्याने या उड्डाणपुलावरच आता मोठी वाहतूक कोंडी होत आहे. उड्डाणपुलावर पडलेले खड्डे आणि होणारी वाहतूक कोंडीमुळे खड्ड्याने आतापर्यतचा कोट्यवधींचा निधीही खड्ड्याच गेल्याची चर्चा या पुलावरून जाणारे वाहनचालक करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या खड्ड्यांकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहन चालकांमध्ये मनपा प्रसंगासनाच्या दुर्लक्षित कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी म्हणून स्व राजीव गांधी उड्डाणपूल २००६ मध्ये उभारण्यात आला. विशेष म्हणजे हा उड्डाणपूल सुरुवातीपासूनच कमकुवत असून, तीन वर्षांपासून अवजड वाहनांसाठी तो बंद केला आहे. मागील पाच महिन्यांपासून या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला सात कोटी रुपये खर्च केले असून अजूनही दिखाव्यासाठी हे दुरुस्ती काम सुरूच आहे. मात्र, अजूनही उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आला नसून, या उड्डाणपुलावर पडलेले खड्डे हे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. हा उड्डाण पूल सुरुवातीपासून नादुरुस्त असल्याने याच्या डागडुजीकडे नेहमीच दुर्लक्ष होत आले आहे.
या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून सुमारे सात कोटी रुपये मंजूर झाल्यानंतर येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीस सुरवात झाली. परंतु केवळ कल्याण नाक्यावरून धामणकर नाका दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे दुरुस्ती पूर्ण झाली. आणि त्यानंतर पावसाळा सुरू झाल्याने उर्वरित भागातील दुरुस्ती रखडली असून आता या उड्डाणपुलावार मोठ मोठे खोल खड्डे पडल्याने या उड्डाणपुलावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी व चार चाकी वाहनचालक मेटाकुटीला आले असून या खड्ड्यांमुळे अनेक अपघात या रस्त्यावर होत आहेत. तर, खड्ड्यात आपटून वाहने देखील नादुरुस्त होत असल्याने चालकांना आर्थिक फटका बसत आहे. मात्र पुलावर पडलेल्या खड्यांच्या दुरुस्तीकडे भिवंडी महानगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून दुरुस्ती कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदार व मनपातील बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून लवकरात लवकर या उड्डाणपुलावर पडलेले खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांसह चालकांनाकडून केली जात आहे.