शुद्ध पाण्यासाठी किआॅस्कचा उतारा
By admin | Published: October 26, 2015 12:44 AM2015-10-26T00:44:14+5:302015-10-26T00:44:14+5:30
ठाण्यातील ज्या भागात पाणी पोहोचत नाही अथवा जे भाग अद्याप विकसित झालेले नाहीत, तसेच काही झोपडपट्टी भागात आता पीपीपीच्या माध्यमातून पिण्याचे शुद्ध पाणी विकण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे : ठाण्यातील ज्या भागात पाणी पोहोचत नाही अथवा जे भाग अद्याप विकसित झालेले नाहीत, तसेच काही झोपडपट्टी भागात आता पीपीपीच्या माध्यमातून पिण्याचे शुद्ध पाणी विकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिका २० लीटरमागे सात रुपये वसूल करणार आहे. त्यातून विशेष म्हणजे यासाठी किआॅस्कचा वापर करून त्या ठिकाणी एटीएम कार्डप्रमाणे कार्ड दिले जाणार असून ते स्वाइप केल्यावर जेवढे पाणी हवे आहे, तेवढे उपलब्ध होणार आहे. परंतु, यामुळे टँकरलॉबीला आळा बसणार असून टँकरपेक्षा कमी दरात हे पाणी उपलब्ध होणार आहे.
ठाणे शहर दिवसेंदिवस विस्तारत असून जिथे जागा मिळेल तिथे नागरी वस्ती निर्माण होत आहे. परिणामी, पालिकेच्या वतीने पुरवण्यात येणाऱ्या नागरी सुविधांवरदेखील ताण पडत असून काही परिसरात तर पाण्यासारखी मूलभूत सुविधा पुरवणे पालिकेला शक्य नाही. या परिसरात पालिकेच्या पाइपलाइन टाकणेदेखील अशक्य असल्याने नागरिकांना जास्त पैसे देऊन टँकरचे पाणी वापरण्याशिवाय पर्याय नाही. महासभेत या प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी अशा परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी किआॅस्क या वितरण व्यवस्थेचा पर्याय पालिकेने शोधला आहे. त्यानुसार, पीपीपी तत्त्वावर ही प्रणाली विकसित होणार आहे. पाच वर्षांसाठी हा प्रकल्प खाजगी संस्था चालविणार आहे. (प्रतिनिधी)