इथल्या पोलिसांना जमत नसेल तर सीबीआयची मदत घेण्यास अडचण काय, किरीट सोमय्यांचा सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 02:35 PM2020-07-31T14:35:21+5:302020-07-31T14:36:09+5:30
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध लवकर लागणे आवश्यक असताना शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार सहकार्याची भूमिका घेत नसल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
ठाणे - अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येचा तपास इथल्या पोलिसांना जमत नसेल तर सीबीआय किंवा बिहार पोलिसांना तपास देण्यास अडचण काय आहे ?असा प्रश्न भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.आत्महत्येच्या कारणांचा शोध लवकर लागणे आवश्यक असताना शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार सहकार्याची भूमिका घेत नसल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपुत यांच्या आत्महत्या प्रकरणात दररोज नव्या गोष्टी समोर येत असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी होऊ लागली आहे.भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे वाढीव वीज बिलाच्या संदर्भात पत्रकार परिषद घेण्यासाठी ठाण्याच्या खोपट येथील भाजप कार्यालयात आज आले होते त्यावेळी सोमय्या यांनीही सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआय किंवा बिहार पोलिसांकडे द्यावा अशी मागणी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनीही गृहमंत्री अनिल देशमुख भेट घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती.मात्र अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशीला स्पष्ट नकार दिला आहे.दुसरीकडे ठाण्यात आलेल्या किरीट सोमय्या यांनी सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणात सहकार्य करत नसल्याचा स्पष्ट आरोप केल्याने आता सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.