Kirit Somaiyya: 'संजय राऊतांच्या मुलीच्या पंचतारांकीत लग्नसोहळ्याचे बिल कुणी भरले?'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 04:25 PM2022-02-14T16:25:37+5:302022-02-14T16:31:58+5:30
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या विवाहसोहळा एका पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा झाला. या सोहळ्यातील कार्यक्रमांचे लाखो रुपयांचे बिल कोणी भरले, असा प्रश्नही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे
ठाणे/मुंबई - शिवसेना आणि भाजप वाद चांगलाच विकोपाला पोहोचला आहे. सध्या गोव्यात राजकीय वातावरण तापल असून पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनीही भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. तर, खासदार संजय राऊत हे भाजपशी दैनिक सामना करताना दिसत आहेत. हमने बहुत बरदाश्त किया है ना.. तो बरबाद भी हम ही करेंगे, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपला रोखठोक इशारा दिला. उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद होईल, अशा इशाराही त्यांनी भाजपला दिला. दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांना लक्ष्य केलं आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या विवाहसोहळा एका पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा झाला. या सोहळ्यातील कार्यक्रमांचे लाखो रुपयांचे बिल कोणी भरले, असा प्रश्नही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. सोमय्या हे नगरसेवक संजय वाघुले यांच्या कार्यालयात आले असता, तिथे कार्यकर्त्यांबरोबर त्यांनी संवाद साधला. यावेळी, पुणे येथील कोविड सेंटरमधील भ्रष्टाचारावरही त्यांनी भाष्य केलं. या जम्बो कोविड सेंटरमधील आपण गैरव्यवहाराविरोधात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सर्व पुरावे देण्यात आले आहेत. मात्र, अद्याप कुठलिही कारवाई नाही. विशेष म्हणजे काळ्या यादीत टाकलेल्या लाइफ लाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सव्र्हिसेस या कंपनीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीच पाच कोविड सेंटरचे कंत्राट दिल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
सरनाईकांना २१ कोटी भरावेच लागतील
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डनला माफी दिली, तरी त्यांना २१ कोटी रुपये भरावे लागतील. त्यासाठी भाजपकडून कायदेशीर लढाई लढली जाईल, असेही त्यांनी सागितले.
उद्या पत्रकार परिषदेत उत्तर देऊ
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. शिवसेना नेते, ठाकरे कुटुंबावर सातत्यानं चिखलफेक सुरू आहे. आरोप केले जात आहेत. या सगळ्या आरोपांना उद्या आम्ही शिवसेना भवनातून उत्तर देऊ. उद्या काय होतं ते पाहाच. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. ती मर्यादा त्यांनी ओलांडली आहे. आता पुढे काय होतंय ते बघा, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपला इशारा दिला.
भाजपचे साडेतीन लोकं कोठडीत असतील
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांपाठोपाठ महाविकास आघाडीचे मंत्री तुरुंगात जातील. त्यांच्या कोठडीच्या बाजूला त्यांची जागा असेल असं भाजपचे नेते सांगत असतात. पण पुढील काही दिवसांत भाजपचे साडेतीन लोक त्याच कोठडीत असतील आणि देशमुख बाहेर असतील. राज्यात सरकार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि ते सरकार शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा, असा गर्भीत इशाराच राऊत यांनी दिला.