किसन कथोरे ठरले विक्रमादित्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 01:28 AM2019-10-25T01:28:24+5:302019-10-25T01:29:05+5:30
मुरबाड मतदारसंघातून आमदार किसन कथोरे यांनी विक्रमी विजय मिळविला आहे.
मुरबाड : मुरबाड मतदारसंघातून आमदार किसन कथोरे यांनी विक्रमी विजय मिळविला आहे. तब्बल एक लाख ३६ हजार ४० मतांच्या फरकाने विजय मिळवित कथोरे यांनी कोकण पट्ट्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा मान मिळविला आहे. तर, राज्यात सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे एकमेव आमदार कथोरे राहिले आहे. राज्यातील विक्रमी मताधिक्याने निवडून आलेल्या अजित पवार, विश्वजित कदम यांच्यापाठोपाठ आमदार कथोरे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहे.
मुरबाड मतदारसंघातून कथोरे यांचा विजय निश्चित असला, तरी तो विजय किती मताधिक्यांनी होणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. कथोरे यांचे मताधिक्य सर्वाधिक राहील, असा विश्वास होता. आजच्या निकालात कथोरे हे सुरुवातीपासून आघाडीवर होते. निकालांती कथोरे यांना एक लाख ७४ हजार ६८ मते मिळाली. तर, राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदुराव यांना ३८ हजार २८ मते मिळाली. कथोरे यांच्या विजयासोबत त्यांच्याविरोधात असलेल्या सर्वच उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली.
निकाल लागत असताना कथोरे हे आपल्या निवासस्थानीच होते. निकाल अंतिम टप्प्यात आल्यावर ते मुरबाडला निघाले. मुरबाडमध्ये येताच त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅली काढून ही रॅली मुरबाडमध्ये फिरली. शेकडो भाजप पदाधिकारी आणि शिवसैनिक या रॅलीत सहभागी झाले होते. या विजयानंतर कथोरे यांनी या विजयाचे श्रेय मुख्यमंत्र्यांना दिले. त्यांनी जो विश्वास ठेवला, तो विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न आपण केल्याचे त्यांनी सांगितले. कथोरे आणि हिंदुराव यांच्याव्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडीचे दीपक खांबेकर यांना आठ हजार ५०४ मते मिळाली.
विजयाच्या आधीच दिवाळी
बदलापूर /मुरबाड : मुरबाड मतदारसंघातील आमदार किसन कथोरे यांचा विजय निश्चित होईल हे अपेक्षित असल्याने कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्रीच सर्वत्र अभिनंदनाचे फलक लावले होते. मतमोजणीला सुरूवात झाल्यावरही कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड होता. सकाळी ११ पासूनच कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली होती. मात्र स्वत: आमदार निकालाच्या ठिकाणी १ वाजता आल्याने त्या वेळेस खरा जल्लोष झाला. सर्व रस्ते गाड्या आणि कार्यकर्त्यांनी भरले होते.
मुरबाडमध्ये सकाळपासूनच निकालाचा कौल वेगाने लागण्यास सुरूवात झाली होती. या ठिकाणी सात उमेदवार असल्याने मतमोजणीचा वेग जलद होता. मतमोजणीच्या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात गर्दी करण्यास सुरुवात केली. कथोरे यांच्या गाड्यांचा ताफा येताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन रॅली मुरबाडमध्ये काढण्यात आली.
दोन यंत्रे बिघडल्याने निकालाला विलंब
मुरबाड मतदारसंघात अवघे सात उमेदवार असल्याने त्यांची मतमोजणी ही जलद गतीने झाली. वेगवान निकाल लागत असताना या निकालाचा शेवट मात्र संथ झाला. दोन यंत्रे हे आकडे दाखवत नसल्याने त्या यंत्रासोबत असलेल्या व्हीव्हीपॅटमधील स्लिप मोजण्यास सुरुवात झाली. त्यामुळे अंतिम निकाल येण्यास विलंब लागला.