किसन नगर, लोकमान्य, कोपरी आणि राबोडीतून होणार क्लस्टरचा श्रीगणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 04:17 PM2018-04-23T16:17:40+5:302018-04-23T16:17:40+5:30
ठाण्यातील क्लस्टरचा श्रीगणेशा येत्या आॅक्टोबर महिन्यात होणार आहे. त्यानुसार या पहिल्या टप्यात किसन नगर, लोकमान्य नगर, राबोडी आणि कोपरी भागात या योजनेचा शुभारंभ होणार आहे.
ठाणे - ठाणे शहरात क्लस्टर योजना हे शहरातील ४४ सेक्टरमध्ये राबविली जाणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात ही योजना ५ सेक्टरमध्ये राबविली जाणार असून त्या अतंर्गत तब्बल २३ टक्के जागा विकसित केली जाणार आहे. त्यानुसार आता पहिल्या टप्याचा शुभारंभ येत्या आॅक्टोबर महिन्यात होणार हे यापूर्वीच आयुक्तांनी स्पष्ट केले असून या टप्यात राबोडी, कोपरी, लोकमान्य नगर आणि किसनगर भागात या योजनेचा श्रीगणेशा होणार असल्याचे पालिकेच्या सुत्रांनी स्पष्ट केले आहे.
ठाणे महापालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या क्लस्टर या योजनेचे सादरीकरण नुकतेच महासभेत देखील करण्यात आले आहे. आता योजनेतील सेक्टरचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून त्यामध्ये लोकसंख्येच्या मानाने कोणत्या सोई सुविधा उपलब्ध आहेत, रुग्णालये, पोलीस ठाणे, गार्डन, आदींसह इतर सुविधा उपलब्ध आहेत. याचा अभ्यास करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तयार करण्यात आलेल्या नव्या अर्बन रिन्हीवल प्लॅनमध्ये शहराच्या विकास आराखड्यातील शिल्लक राहिलेल्या बाबींचा देखील यात समावेश केला जाणार आहे. त्यानुसार लोकसंख्येच्या मानाने ज्या काही सुविधा देणे बंधनकारक असतील त्या देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शिवाय बाधीत झालेली आरक्षणे देखील या माध्यमातून विकसित केली जाणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. तर पहिल्या पाच सेक्टरमध्ये लोकमान्य नगर, राबोडी, किसनगर, लोकमान्य नगर या भागात ही योजना राबविली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. या योजनेत, ३०० चौरस फुटापर्यंत मोफत घर उपलब्ध होणार आहे. परंतु त्यापेक्षा एखाद्याला जास्त चौरस फुटांचे घर हवे असल्यास ३०० चौरस फुटापुढील क्षेत्रासाठी त्याला कन्स्ट्रक्शन कॉस्टनुसार पैसे मोजावे लागणार आहेत.
कोपरीमध्ये होणाऱ्या क्लस्टरचे सादरीकरण रविवारी कोपरीत झाले. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आयुक्त संजीव जयस्वाल आदींसह स्थानिक नगरसेवक देखील उपस्थित होते. कोपरीमध्ये गावठाण भाग देखील येत आहे. तसेच काही भाग हा सीआरझेडने व्यापलेला आहे. कोपरीमध्ये ४५.९० हेक्टर परिसरात १.२७ टक्के परिसर हा सीआरझेडने व्यापलेला आहे. तर कोपरी गावठाणचा ५.९४ हेक्टर एरिया आहे. त्यानुसार या परिसराचा आता विकास केला जाणार आहे. दुसरीकडे राबोडीचा म्हणजेच अगदी गजबलेला परिसराचा विकास हा पहिल्या टप्यात होणार आहे. ३७.९१ हेक्टर एरिया असून त्यामध्ये ०.८५ टक्के परिसर हा सीआरझेडने बाधीत आहे. तर किसन नगर मध्ये १६०.३७ हेक्टरचा विकास हा क्लस्टर अंतर्गत केला जाणार आहे. यामध्ये ०.०९ टक्के परिसर हा फॉरेस्टने व्यापला आहे. तर लोकमान्य नगरचा ६०.५१ हेक्टर परिसराचा विकास हा क्लस्टर अंतर्गत केला जाणार आहे. यामध्ये ०.६५ टक्के एरिया हा फॉरेस्टने बाधीत आहे. परंतु आता या जागांचे अंतिम आराखडे तयार असून याच्या निविदा देखील आता काढल्या जाणार आहेत. त्यानुसारच नागरीकांच्या मतांचा कौल आता घेतला जात आहे.