किशोर पवार यांच्या कुटुंबीयांना मिळणार आर्थिक मदत, प्रस्ताव महासभेच्या पटलावर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 05:16 PM2017-10-06T17:16:02+5:302017-10-06T17:16:16+5:30
ठाण्यामध्ये पाचपाखाडी येथे झाड पडून वकील किशोर पवार यांचा अकाली मृत्यू झाला. ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण व वृक्ष अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याने किशोर पवार यांच्या पत्नीला महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानाने केली होती.
ठाणे - ठाण्यामध्ये पाचपाखाडी येथे झाड पडून वकील किशोर पवार यांचा अकाली मृत्यू झाला. ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण व वृक्ष अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याने किशोर पवार यांच्या पत्नीला महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानाने केली होती. परंतु आता पवार यांच्या कुटुंबीयाला आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.
जुलै महिन्यात पाचपाखाडी भागात सायंकाळी झाडाखाली उभ्या असलेल्या वकील किशोर पवार यांच्यावर झाड पडून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर पालिकेवर चांगलीच टीकेची झोड उठली होती. अनेकांनी पालिकेच्या संबंधित अधिका-यांवर गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी केली होती. मागील महिन्यात ठाणे मतदाता जागरण अभियानाअंतर्गत महापालिकेवर मोर्चा काढला होता. या मोर्चाद्वारे किशोर पवार यांच्या पत्नीला नोकरीवर सामावून घेण्यात यावे, अशी मागणी केली होती. परंतु आता येत्या महासभेत मात्र किशोर पवार यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार किती मदत मिळणार याचा उल्लेख सध्या करण्यात आला नसला तरी महासभाच याचा निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. परंतु त्यांच्या पत्नीला पालिका सेवेत सामील करून घेण्याबाबतही काही लोकप्रतिनिधी आग्रही आहेत. त्यांच्या या मागणीचा विचार होणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.