ठाण्यातील आचार्य अत्रे कट्ट्यावर कट्टेकरांनी अनुभवले बिबट्यांचे विश्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 04:44 PM2019-08-01T16:44:35+5:302019-08-01T17:11:16+5:30
आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळातर्फे बिबट्यांचे विश्व या विषयावर निकीत सुर्वे याने लोकांमध्ये बिबट्याविषयी असलेले गैरसमज दूर केले.
ठाणे: बिबट्यांचे विश्व अत्रे कट्ट्यावरील प्रेक्षकांना पीपीटीच्या माध्यमातून अनुभवता आले. वन्यप्राणी मित्र निकीत सुर्वे यांनी कट्टेकऱ्यांना बिबट्याची जणू सफरच घडवली. लोकांमध्ये बिबट्यांविषयी गैरसमज असल्याने त्याची भिती वाटत आहे. महाराष्ट्रातील बिबट्यांना मराठी नावाने हाक मारली जाते परंतू महाराष्ट्राबाहेरील बिबट्यांना इंग्रजी नावे ठेवली असल्याचे गमती जमतीही निकीतने सांगितल्या.
अत्रे कट्ट्यावर आयोजित कार्यक्रमात निकीतने कट्टेकऱ्यांना बिबट्यांच्या विश्वात नेले. निकीत म्हणाला की, बिबट्या जेरबंद केल्यावर पुढची प्रक्रिया जी असते ती बिबट्यासाठी प्रचंड मानसीकदृष्ट्या त्रासदायक असते. आपणच कचरा निर्माण करुन बिबट्याला आमंत्रित करतो. जिथे कचरा तिथे कुत्रा आणि जिथे कुत्रा तिथे बिबट्या. कुत्रा हे बिबट्याचे सहज मिळणारे खाद्य आहे त्यामुळे कचºयाच्या ठिकाणी बिबट्याचा वावर सुरू होतो कारण त्याला माहित असते याठिकाणी त्याचे खाद्य त्याला मिळणार आहे. तुमच्या परिसरात बिबट्या तुमच्या इमारती किंवा गाड्या पाहायला येत नाही तर तिथे त्याचे भक्ष्य असते म्हणून तो येत असतो अशा कानपिचक्याही निकीतने दिल्या. बिबट्यांची संख्या वाढली असे नसून लोक जागे राहतात म्हणून बिबट्या आल्याचे कळते आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या गोष्टी पसरवत चालल्याने बिबट्यांची संख्या वाढल्याचा समज पसरला आहे. बिबट्या हा वाटांवर चालणारा प्राणी आहे. बिबट्याच्या विष्ठेवरुन दुसºया बिबट्याला कळतं की ती त्याची हद्द आहे. प्रत्येक बिबट्याच्या शरिरावर ठिपक्यांची वेगवेगळी डिझाईन्स असतात. मुळात बिबट्या हा माणासाला घाबरतो, तो आठ ते दहा वर्षे जगणारा प्राणी आहे. रात्रीच्या वेळी एकटे दुकटे जाऊ नये, त्यांना घेराव घालू नये. बिबट्या खुप उंच प्राणी आहे असा आपला समज आहे. परंतू तो फार मोठा नसून कुत्र्यापेक्षा थोडासा उंच असतो. स्वत:ला परिस्थीतीशी जुळवून घेणारा प्राणी म्हणजे बिबट्या. कोणताही आधार न घेता बिबट्या १० फुट उंच उडी मारु शकतो. मादी आपल्या पिल्लांना आपल्यासोबत दीड ते अडीच वर्षे ठेवते, त्या कालावधीत ती त्याला काय खावे, काय खाऊ नये, कशी शिकार करावी हे शिकवत असते. त्यानंतर तो पिल्लू स्वावलंबी बनून स्वत:ची हद्द बनवितो अशी माहिती निकीतने दिली.