ठाण्यात नळावर झालेल्या पुरुषांच्या भांडणातून एकावर दुस-याने केला चाकूने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 08:07 PM2018-01-08T20:07:07+5:302018-01-08T20:40:03+5:30
ठाण्याच्या बाळकूम भागात नळावर झालेल्या भांडणातून एका पुरुषाने दुस-याच्या डोक्यात चाकूने वार केल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकाराने परिसरातील रहिवाशांसह पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले.
ठाणे : पाणी भरण्याच्या वादातून एरव्ही, महिलांमध्ये कडाक्याची भांडणे झाल्याची अनेक प्रकरणे आहेत. ठाण्याच्या बाळकूम भागात मात्र दोन पुरुषांमध्ये चांगलीच जुंपली. यातून सागर शिल्पकार (२२) या तरुणावर रविवारी रात्री चाकूचे वार करून सुरेश नामक व्यक्ती पसार झाला आहे. त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले.
ठाण्याच्या बाळकूम दादलानी पार्क बेकरी समोरील रोडवर असलेल्या नळावर रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सागर हा पाणी भरत होते. त्याचवेळी तिथे आलेल्या सुरेशने ‘पाणी भरता है क्या, नल तुम्हारे बाप का है क्या,’ असे म्हणून त्याला शिवीगाळ केली. त्यावर शिवीगाळ केल्याचा जाब सागरने त्याला विचारला. याचाच राग आल्याने सुरेशने सागरच्या डोक्यावर चाकूने वार केला. दुसºयांदाही त्याने पुन्हा सागरच्या डोक्यावर चाकूने वार करण्याचा त्याने प्रयत्न केला असता, तो त्याने चुकविला. मात्र, त्याच्या गळयावर दोन ठिकाणी वार करुन त्याला जखमी केले. यात गंभीर जखमी झालेल्या सागरला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, सुरेशविरुद्ध सोमवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. उपनिरीक्षक एच. एस. चिरमाडे हे अधिक तपास करीत आहेत.