अपंग शिक्षिकेचा ज्ञानदानाचा वसा; व्यंगावर मात करत जिद्दीने वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 12:40 AM2020-10-09T00:40:21+5:302020-10-09T00:40:26+5:30
प्रतिभा हिलीम या प्राथमिक शिक्षिका म्हणून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पंचायत समितीअंतर्गत राहनाळ येथे कार्यरत असताना २०१९ साली तापामुळे आजारी पडल्या. हा आजार एवढा बळावला गेला की त्यांना आपले दोन्ही हातपाय अर्ध्यातून गमवावे लागले. मात्र एवढे मोठे संकट आले तरीही त्या खचल्या नाहीत.
- हुसेन मेमन
जव्हार: असे एकही क्षेत्र नाही की ज्यात महिलांनी आपली छाप पाडली नाही. अशीच एक प्रेरणादायी कहाणी पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील कºहे येथील प्रतिभा हिलीम या अपंग शिक्षिकेची आहे. जिद्दी, हुशार, कष्टाळू व समर्पण भावनेने ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या या शिक्षिकेची कहाणी निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे.
प्रतिभा हिलीम या प्राथमिक शिक्षिका म्हणून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पंचायत समितीअंतर्गत राहनाळ येथे कार्यरत असताना २०१९ साली तापामुळे आजारी पडल्या. हा आजार एवढा बळावला गेला की त्यांना आपले दोन्ही हातपाय अर्ध्यातून गमवावे लागले. मात्र एवढे मोठे संकट आले तरीही त्या खचल्या नाहीत. त्यांचे मूळ गाव विक्र मगड तालुक्यातील कºहे असल्यामुळे आपण गावाच्या ॠणात आहोत याची जाणीव ठेवून त्या आपल्या गावी आल्या. त्यानंतर कोरोनाच्या जागतिक संकटामुळे शाळा बंद झाल्या. शाळा सुरू करण्याजोगी परिस्थिती कधी निर्माण होईल, हेही सांगता येणे कठीण झाले. शाळा सुरू झाल्याच तरी सामाजिक अंतराचे नियम काय असतील आणि ते पाळून शाळा पूर्ववत चालवता येतील का, हेही सांगता येणे कठीण झाले. सरकारने शाळा ‘आॅनलाईन’ सुरू करायला परवानगी दिली. अनेक शाळांनी आॅनलाईन उपक्रम सुरू देखील केले. परंतु ग्रामीण भागात नेटवर्क नसणे, पालकांकडे अॅण्ड्राइड मोबाइल नसणे यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत.
ही बाब त्यांच्या लक्षात आली. या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून येथील विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांनी ज्ञानदानाच्या कार्याला सुरुवात केली. आपल्या अपंगावर यशस्वीपणे मात करत जे विद्यार्थी आज आॅनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत अशा विद्यार्थ्यांना शिकविण्याचे कार्य त्या करीत आहेत.
इयत्ता पहिली ते सातवीपर्र्यंतच्या साधारणपणे २५ विद्यार्थ्यांना त्या शिकविण्याचे काम करतात. आपल्या हाताच्या बेल्टला पेनाचे टोपण लावून त्यात खडू वापरून त्या विद्यार्थ्यांना शिकवितात. त्यांचे हे ज्ञानदानाचे कार्य खरोखरच सर्वाना प्रेरणा देणारे आहे.
कोरोना महामारीच्या काळात सरकारने शाळा ‘आॅनलाइन’ सुरू करायला परवानगी दिली. परंतु, ग्रामीण भागात नेटवर्क नसणे, पालकांकडे अँड्राइड मोबाइल नसणे, यामुळे अनेक विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित आहेत. ही बाब माझ्या लक्षात आली आणि मग या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम सुरू करण्यात आले.
- प्रतिभा हिलीम, प्राथमिक शिक्षिका