ज्ञान-विज्ञान वाहिन्या हव्या मराठीतून
By admin | Published: January 23, 2017 05:37 AM2017-01-23T05:37:05+5:302017-01-23T05:37:05+5:30
ज्ञान-विज्ञानाच्या वाहिन्या मराठीतून असाव्या, यासाठी ‘मराठी बोला’ चळवळीने पुढाकार घेतला असून तशी पत्रे विद्यार्थ्यांनी विविध वाहिन्यांना
जान्हवी मोर्ये / डोंबिवली
ज्ञान-विज्ञानाच्या वाहिन्या मराठीतून असाव्या, यासाठी ‘मराठी बोला’ चळवळीने पुढाकार घेतला असून तशी पत्रे विद्यार्थ्यांनी विविध वाहिन्यांना पाठवली आहेत. इंग्रजी, हिंदीसोबतच अन्य प्रादेशिक भाषेत जर या वाहिन्यांचे प्रसारण होत असेल, तर १२ कोटी प्रेक्षक असलेल्या मराठीवर अन्याय का, असा प्रश्न चळवळीच्या प्रमुख वृषाली गोखले यांनी उपस्थित केला आहे.
डिस्कव्हरी वाहिनी इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि बंगाली भाषांमध्ये प्रसारण करते. नॅशनल जिओग्राफिक वाहिनी जगभरात वेगवेगळ््या २५ भाषांमध्ये आणि भारतात हिंदी, तामिळ, तेलगू आणि बंगाली या भाषांत प्रसारण करते. त्यात मराठीची भर पडणे गरजेचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘मराठी बोला’ चळवळीने शाळेतील मुंबई-ठाणे जिल्ह्यातील २५०० मुलांकडून या मागणीची पत्रे लिहून घेतली आहेत आणि ती वाहिन्यांना पाठवून ही मागणी लावून धरली जाणार आहे. मराठी भाषेत ज्ञान मिळणे, मराठीत सेवा मिळणे हा आपला अधिकार आहे. त्यामुळे या चळवळीत सहभागी व्हा, असे आवाहन संंस्थेने मुलांना केले आहे.
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, जीवशास्त्र, इतिहास, सामान्यज्ञान असे एरवी रटाळ वाटणारे विषय या वाहिन्यांवर मुले आनंदाने पाहतात. या ज्ञानवाहिन्या त्यांच्या पातळीवर येतात. त्यांच्याशी संवाद साधतात. त्यातून मुलांना माहिती कळते. पण हेच ज्ञान जर मराठीत मिळाले, तर आपण अजून एक पाऊल पुढे जाऊ शकतो, असा मुद्दाही गोखले यांनी मांडला.