कोमील मर्चंटला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी, गोव्यातून केली होती अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 03:07 AM2017-12-19T03:07:57+5:302017-12-19T03:08:08+5:30
अमलीपदार्थाच्या तस्करीच्या गुन्ह्यात मुंब्रा येथील कोमील मर्चंटला सोमवारी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. ठाण्याच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने त्याला शनिवारी गोव्यातून अटक केली होती.
ठाणे : अमलीपदार्थाच्या तस्करीच्या गुन्ह्यात मुंब्रा येथील कोमील मर्चंटला सोमवारी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
ठाण्याच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने त्याला शनिवारी गोव्यातून अटक केली होती. मुंब्रा येथे काही आरोपी एमडी या अमलीपदार्थाच्या विक्रीसाठी एका कारमध्ये येणार असल्याची माहिती १४ नोव्हेंबरला पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मुबस्सीर हमजा माटवणकर आणि मोहम्मद शयान अब्दुल सकुर खान यांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी १७ नोव्हेंबरला सिराज शेख नसीर मुन्शीलाही अटक केली. पोलिसांचा खबरी कोमील अन्वरअली मर्चंटच्या सांगण्यावरून अमली पदार्थ विक्रीसाठी दिल्याचा जबाब त्याने पोलिसांकडे नोंदविला.
कारमुळे पटली खात्री
कोमील मर्चंट हा पणजी येथील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती अमलीपदार्थविरोधी पथकास मिळाली होती.
पणजी येथील हॉटेलमध्ये पथक पोहोचल्यानंतर कोमील
तिथेच आहे अथवा नाही, याची खात्रीलायक माहिती मिळणे कठीण झाले होते. त्या वेळी हॉटेलसमोर पोलिसांना मुंबईमध्ये नोंदणी झालेली एक कार दिसली. त्यावरून पोलिसांना
खात्री पटली आणि सापळा रचून कोमीलला अटक करण्यात आली. त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.