शेलार ग्रामपंचायतीचे कोविड सेंटर अडकले लालफितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:41 AM2021-05-19T04:41:13+5:302021-05-19T04:41:13+5:30

भिवंडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शेलार ग्रामपंचायतीने उभारलेल्या कोविड सेंटरला जिल्हाधिकारी कार्यालयाने अद्याप मंजुरी दिली नसल्याने ते रुग्णांच्या सेवेत ...

Kolar Center of Shelar Gram Panchayat stuck in red tape | शेलार ग्रामपंचायतीचे कोविड सेंटर अडकले लालफितीत

शेलार ग्रामपंचायतीचे कोविड सेंटर अडकले लालफितीत

Next

भिवंडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शेलार ग्रामपंचायतीने उभारलेल्या कोविड सेंटरला जिल्हाधिकारी कार्यालयाने अद्याप मंजुरी दिली नसल्याने ते रुग्णांच्या सेवेत येऊ शकत नाही, अशी खंत सरपंच ॲड. किरण चन्ने यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकारी विनाकारण खोडा घालत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

ग्रामपंचायतीने पुढाकार घेत ५० बेडचे सुसज्ज कोविड सेंटर १५ दिवसांत ग्रामनिधी व लोकसहभागातून उभारले. सरपंच चन्ने यांनी ग्रामपंचायत पातळीवर कोविड सेंटर जिल्हा परिषद शाळेत ग्रामनिधीतून उभारण्याचा निर्णय सभेत घेत कार्यवाही सुरू केली. त्यांच्या प्रयत्नांना ग्रामस्थांनी सहकार्याचा हात पुढे करीत १५ दिवसांत शाळेचे रूपांतर सुसज्ज कोविड सेंटरमध्ये करण्यात आले. सरकारी सर्व नियमांचे पालन करीत हे सेंटर उभारले आहे. कोविड सेंटर परिसरात सीसीटीव्ही केमॅरे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी निवासाची सोयही करण्यात आली आहे. तसेच रुग्णांना सकस आहार मिळावा यासाठी स्वयंपाकगृहही याठिकाणी उभारण्यात आले आहे.

सरकारी मंजुरीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे पत्रव्यवहार केला. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिल्या गेलेल्या आरोग्य विभागाच्या प्रस्तावात त्रुटी असल्याचे नमूद करीत जिल्हाधिकारी कार्यालयातील आरोग्य विभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्यांनी परवानगी नाकारल्याने हे सेंटर तयार होऊनही सर्वसामान्य रुग्णांच्या सेवेत येऊ शकले नाही याची खंत चन्ने यांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती कुंदन पाटील यांनीही केंद्राबद्दल प्रशंसा केली. परंतु, क्षुल्लक त्रुटी दाखवून परवानगी न देणे म्हणजे सर्वसामान्य रुग्णांच्या जिवाशी खेळण्यासारखे आहे, असे ते म्हणाले. या सेंटरसाठी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट, अग्नी व विद्युत यंत्रणेचे परीक्षण ग्रामपंचायतीने स्वखर्चाने करून घेत सर्व अटींची पूर्तता केली असतानाही आरोग्य विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केलेल्या प्रस्तावात त्रुटी असल्याचे कारण दाखविले जाते हे चुकीचे असल्याचे सांगितले. असंवेदनशील, उदासीन प्रशासन यंत्रणेचे हे अपयश असून, कोविड सेंटर तयार असून ते सुरू होऊन रुग्णांच्या उपयोगी यावे हीच आमची इच्छा आहे. जर रुग्ण दगावल्यास त्यास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही चन्ने यांनी दिला आहे.

Web Title: Kolar Center of Shelar Gram Panchayat stuck in red tape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.