कोकण पदवीधर : भाजपाला धूळ चारण्यावर सेना ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 05:24 AM2018-06-08T05:24:42+5:302018-06-08T05:24:42+5:30
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीची पायरी चढून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गुफ्तगू केल्यानंतरही युतीमधील तणाव कमी झाल्याचे दिसत नाही.
ठाणे : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीची पायरी चढून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गुफ्तगू केल्यानंतरही युतीमधील तणाव कमी झाल्याचे दिसत नाही. कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेण्याचा शिवसेनेचा इरादा नाही. उलटपक्षी, आम्ही जिंकण्यासाठी मैदानात उतरलो आहोत, असे शिवसेनेने स्पष्ट केले. याच न्यायाने मुंबई पदवीधर मतदारसंघात भाजपाने शिवसेनेविरोधात उमेदवारी दाखल केली आहे.
भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या चर्चेचे फलित म्हणून कोकण व मुंबई पदवीधर मतदारसंघांत परस्परांविरुद्ध दिलेले उमेदवार माघार घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अद्याप त्या दिशेने हालचालीची चिन्हे दिसत नाहीत. अर्थात, उमेदवारी अर्ज ११ जूनपर्यंत मागे घेण्याचा कालावधी बाकी आहे.
कोकण पदवीधर हा मतदारसंघ वर्षानुवर्षे भाजपाच्या, तर मुंबई पदवीधर हा मतदारसंघ सेनेच्या ताब्यात होता.
कोकण पदवीधर मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध भाजपा सामना अटळ असून शहा-ठाकरे चर्चेनंतरही परिस्थितीत फरक पडलेला नाही, असे स्पष्ट दिसत आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणूक जिंकण्यासाठीच शिवसेनेने उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. अमित शहा हे उद्धव ठाकरे यांना भेटायला आले होते. ठाकरे त्यांना भेटायला गेले नव्हते, हे भाजपाने लक्षात घ्यावे.
- नरेश म्हस्के, जिल्हाप्रमुख, शिवसेना