कोमसापचे वाङमयीन पुरस्कार जाहीर;10 मार्चला वितरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 12:53 PM2019-02-21T12:53:24+5:302019-02-21T12:54:02+5:30
मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे नाट्य संमेलन अध्यक्षांच्या हस्ते वितरण
ठाणे : ज्येष्ठ समीक्षक आणि चरित्रकार डॉ. अनंत देशमुख यांना कोमसापच्या 'कोकण साहित्य भूषण' तर 'निद्रानाश' या कवितासंग्रहासाठी डॉ. महेश केळुसकर यांना 'कविता राजधानी पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. १० हजार रुपये, सन्मानचिन्ह, आणि सन्मानपत्र असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे (कोमसाप) चे २०१८ -२०१९ सालचे वाङमयीन आणि वाङमयीनेतर पुरस्कार बुधवारी पुरस्कार समितीचे निमंत्रक प्रा. अशोक ठाकूर यांनी घोषित केले.
पत्रकार शिल्पा सुर्वे यांनी लिहिलेल्या 'आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर' या चरित्र पुस्तकाला 'धनंजय कीर स्मृती' प्रथम पुरस्कार घोषित झाला आहे. चरित्र आत्मचरित्राचा श्रीकांत शेट्ये स्मृती द्वितीय पुरस्कार उमाकांत वाघ यांच्या 'वळख' या पुस्तकाला जाहीर झाला आहे. कोमसापचा विशेष पुरस्कार विकास वऱ्हाडकर आणि प्रमोद वऱ्हाडकर यांनी संपादित केलेल्या 'बॅनरांजली' ला घोषित झाला आहे
काव्य संग्रहाचा 'आरती प्रभु स्मृती' प्रथम पुरस्कार अनुजा जोशी यांच्या 'उन्हाचे घुमट खांद्यावर' या कविता संग्रहाला तर 'वसंत सावंत स्मृती' द्वितीय पुरस्कार प्रशांत डिंगणकर यांच्या 'दगड' या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. ललित गद्यासाठी 'अनंत काणेकर स्मृती' प्रथम पुरस्कार विनया जंगले यांच्या 'मुक्या वेदना बोलक्या संवेदना' या पुस्तकाला आणि द्वितीय पुरस्कार आर. एम. पाटील यांच्या 'आठवणीतील पानगळ साठवणीतील गुलमोहर' ला मिळाला आहे.
कथासंग्रहासाठी 'व्ही. सी. गुर्जर स्मृती' प्रथम पुरस्कार भा. ल. महाबळ यांच्या 'ओळख' कथासंग्रहाला आणि विद्याधर भागवत स्मृती द्वितीय पुरस्कार अरविंद हेब्बार यांच्या 'दरवळ' या कथासंग्रहाला प्राप्त झाला आहे. याशिवाय समीक्षेचा प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार डॉ. अंजली मस्करेन्हस यांच्या 'आदिवासी लोककथा मीमांसा', बाल वाङमय पुरस्कार रेखा जेगरकल यांच्या 'स्वाती, अक्षय आणि तुम्ही सारे'ला, संकीर्ण वाङमयीन पुरस्कार डॉ किरण सावे यांच्या 'चावार्क दर्शन प्रासंगिकता' आणि वैभव दळवी यांच्या 'सामुद्रायन'ला मिळालाय. नाट्य एकांकिका पुरस्कार शांतीलाल ननावरे यांना 'ही वाट दूर जाते' साठी जाहीर झाला आहे.
पुरस्कार सोहळा कोमसापचे विश्वस्त प्रमुख मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे येथे येत्या १० मार्च रोजी सकाळी १० वाजता होणार असून नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी हे प्रमुख अतिथी आहेत.