‘कोमसाप’चे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन 12, 13 एप्रिलला; निर्बंध शिथिल झाल्यावर पहिला मोठा साहित्यिक उपक्रम 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 05:11 PM2022-04-06T17:11:33+5:302022-04-06T17:12:11+5:30

संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर

konkan marathi sahitya parishad 2nd state level sahitya sanmelan will beheld on April 12, 13 know more details | ‘कोमसाप’चे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन 12, 13 एप्रिलला; निर्बंध शिथिल झाल्यावर पहिला मोठा साहित्यिक उपक्रम 

‘कोमसाप’चे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन 12, 13 एप्रिलला; निर्बंध शिथिल झाल्यावर पहिला मोठा साहित्यिक उपक्रम 

googlenewsNext

ठाणे : कोकण मराठी साहित्य परिषद अर्थात ‘कोमसाप’तर्फे आयोजित दुसरे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन येत्या मंगळवार व बुधवार, 12 व 13 एप्रिल 2022 रोजी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात संपन्न होणार आहे. युवा कादंबरीकार प्रणव सखदेव संमेलनाध्यक्षपदी असणाऱ्या आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के हे स्वागताध्यक्ष पद भूषविणाऱ्या या युवा साहित्य संमेलनाची कार्यक्रमपत्रिका बुधवारी, 6 एप्रिल रोजी आनंद विश्व गुरुकुलमधील संमेलन केंद्रात जाहीर करण्यात आली. राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतरचा पहिला सर्वात मोठा साहित्यिक उपक्रम ठरणाऱ्या या दोन दिवसीय संमेलनात वैचारिक परिसंवाद व साहित्यविषयक सत्रांबरोबरच विविधांगी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

कोमसाप-युवाशक्ती आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाची कार्यक्रमपत्रिका बुधवारी, 6 एप्रिल रोजी माजी महापौर आणि स्वागताध्यक्ष नरेश म्हस्के, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, युवाशक्ती प्रमुख प्रा. दीपा ठाणेकर, ठाणे जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संमेलनासंदर्भात आपली भूमिका मांडली. कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर म्हणाल्या की, युवा वर्गाला साहित्यिक संस्थांनी सामावून घेणे हे साहित्यप्रसारासाठी आवश्यक असते. कोमसाप त्याच दृष्टिकोनातून युवाशक्तीला आवाहन करत आली आहे. तसेच 12 व 13 एप्रिल रोजी होणाऱ्या साहित्य संमेलनात युवा वर्गाला आपले साहित्यिक आणि नेतृत्व गुण दाखविण्याची संधी मिळेल, अशी भावना कीर यांनी यावेळी व्यक्त केली.

तर आजच्या युवा पिढीची स्पंदने टिपणारे विविध कार्यक्रम संमेलनात होणार असल्याचे सांगत माजी महापौर आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष नरेश म्हस्के यांनी- कोमसापच्या युवा साहित्य संमेलनाला बड्या उद्योगसमूहांचे किंवा सरकारचे आर्थिक पाठबळ नसले तरी सुजाण व साहित्यप्रेमी ठाणेकर नागरिक ते यशस्वी करून दाखवतील, असा विश्वास व्यक्त केला. मराठी रॅप-स्टॅण्डअप कॉमेडी यांसारखे नव्या पिढीला आकर्षिक करणारे कार्यक्रम तसेच मराठीबरोबरच अन्य भाषांतील कवितेचाही सन्मान करणारी सत्रे या संमेलनात होणार असून अशी सत्रे यापुढील संमेलनांसाठी वस्तुपाठ घालून देतील, असा आशावादही म्हस्के यांनी यावेळी बोलून दाखवला. 

महापालिकेचे सहकार्य
कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी संमेलनाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असून शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी या संमेलनात सहभागी होणार आहेत, तसेच ठाणे महापालिका संमेलनासाठी सहकार्य करत असल्याचे सांगितले. कोमसापकडून गेल्या चार महिन्यांपासून मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी राष्ट्रपतींना पत्र लिहिण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. एकूण 75 हजार पत्रांपैकी 15 हजार पत्रे आतापर्यंत राष्ट्रपतींना पाठविण्यात आली आहेत. या मोहिमेतील उरलेली पत्रे संमेलनात डाक विभागाकडे सूपूर्द करण्यात येतील, अशी माहितीही प्रा. ढवळ यांनी यावेळी दिली. 

कोमसापच्या युवाशक्ती प्रमुख प्रा. दीपा ठाणेकर यांनी कार्यक्रमपत्रिकेचा यावेळी आढावा सादर केला, तर कोमसापचे प्रसिद्धी प्रमुख जयु भाटकर आणि ठाणे जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर यांनी संमेलनातील महत्त्वाच्या सत्रांची आणि संमेलनानिमित्त प्रसिद्ध होणाऱ्या ‘पालवी’ या स्मरणिकेविषयी माहिती दिली. कोमसापच्या ठाणे शाखेच्या अध्यक्ष संगीता कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

विविधांगी कार्यक्रमांची रेलचेल
कोमसापच्या या दोन दिवसीय राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनात युवा कवींसाठी काव्यसंमेलन, गझलसंमेलन तसेच काव्य व गझल कट्टा, यांबरोबरच कवितांच्या नृत्याविष्काराचा पद्यपदन्यास, कथाकथन, अभिवाचन अशी सत्रे होणार आहेत. याशिवाय बोलीभाषांतील कवितांचे सादरीकरण, बहुभाषिक काव्यसंमेलन, मराठी स्टॅण्डअप कॉमेडी आणि मराठी रॅप गीत सादरीकरण अशा अभिनव कार्यक्रमांचेही संमेलनात आयोजन करण्यात आले आहे. 

तसेच पारलिंगी (ट्रान्सजेण्डर) समूहाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन तपासणारी पारलिंगी कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत यांची विशेष मुलाखत, पुस्तक प्रकाशन व विक्री क्षेत्रातील अनुभवकथनाचे सत्र, पत्रकारिता व युवा पिढी यांविषयची स्थिती-गती मांडणारे चर्चासत्र आणि नवमाध्यमांतील मराठीच्या संधी व शक्यता उलगडून सांगणारा परिसंवाददेखील संमेलनात होणार आहे. बालभारती पाठ्यपुस्तकांतील कवितांचा रंगमंचीय आविष्कार असणारा गंधार कला संस्थेचा ‘कट्टी बट्टी’ हा विशेष कार्यक्रम संमेलनाच्या पहिल्या दिवशी होईल, तर संमेलनाचा समारोप प्रा. प्रदीप ढवळ लिखित आणि मंदार टिल्लू दिग्दर्शित ‘शिवबा... एक महानाट्य’ने होणार आहे.

कार्यक्रमपत्रिका

मंगळवार, 12 एप्रिल 2022

साहित्य दिंडी (सकाळी 8 ते 9 वा.)
ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन (सकाळी 9:10 वा.)
रांगोळी प्रदर्शन उद्घाटन (सकाळी 9:20 वा.)
मुख्य उद्घाटन सोहळा (सकाळी 9:45 ते 11:15 वा.)
संमेलनाध्यक्षांची मुलाखत (सकाळी 11:15 ते 12:15 वा.)
पुस्तकगप्पा (दुपारी 2:30 ते 4 वा.)
कट्टी-बट्टी कार्यक्रम (दुपारी 2:30 ते 3:30)
कोमसाप काव्यकट्टा झपूर्झा (दुपारी 3 ते 5:30 वा.)
युवा कवींचे काव्यसंमेलन (सायं. 4:15 ते 6:15 वा.)
अभिवाचन आणि कथाकथन (सायं. 4 ते 6 वा.)
नवोदितांचा काव्यकट्टा (सायं. 6 ते 7 वा.)
बहुभाषिक काव्यसंमेलन (सायं. 6:30 ते 7:30 वा.)

बुधवार, 13 एप्रिल 2022

पद्यपदन्यास (सकाळी 9:30 ते 11 वा.) 
पद्योक्ती : नवोदितांचा काव्यकट्टा (सकाळी 10:30 ते 12:15 वा.)
माझी मायबोली काव्यसंमेलन (सकाळी 10 ते 11:15 वा.)
मराठी रॅप आणि स्टॅण्डअप कॉमेडी (सकाळी 11 ते 1 वा.)
मुलाखत : ‘मी ते आम्ही’  (सकाळी 11:15 ते 12:15 वा.)
शायराना : नवोदितांचा गझलकट्टा (सकाळी 12:15 ते 1:45 वा.)
गझलकारांचा मुशायरा (दुपारी 2:45 ते 4:30 वा.)
काव्य उपवन (दुपारी 3 ते 5 वा.)
चर्चासत्र : पत्रकारिता आणि युवा पिढी (सायं. 4:45 ते 5:45 वा.)
समारोप सत्र आणि ‘शिवबा एक महानाट्य’चा प्रयोग (सायं. 5:30 ते 8 वा.)

Web Title: konkan marathi sahitya parishad 2nd state level sahitya sanmelan will beheld on April 12, 13 know more details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.