कोकण रेल्वेचे होणार दुपदरीकरण
By admin | Published: October 16, 2015 02:51 AM2015-10-16T02:51:43+5:302015-10-16T02:51:43+5:30
कोकण रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्याचा निर्णय झाला असून, ३१ आॅक्टोबरला कामाला सुरुवात केली जाईल, असे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.
नवी मुंबई : कोकण रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्याचा निर्णय झाला असून, ३१ आॅक्टोबरला कामाला सुरुवात केली जाईल, असे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. त्याशिवाय कोकण रेल्वेचे विद्युतीकरणदेखील होणार असून, सर्व स्थानकांच्या पुनर्बांधणीचेही काम हाती घेतले जाणार असल्याचे त्यांनी वाशी येथे कार्यक्रमात सांगितले.
एकच रेल्वेमार्ग असल्याने पावसाळ्यात दरड कोसळल्यास कोकण रेल्वेची दुतर्फा सेवा ठप्प होते. त्यामुळे कोकण रेल्वेमार्गाचे दुपदरीकण करण्याची गरज असतानाही आजतागायत त्यावर ठोस निर्णय झालेला नव्हता. कोकणवासीयांचा प्रवास सुखद करण्यासाठी दोन्ही बाबींवर केंद्र सरकारने तत्काळ निर्णय घेतल्याचे प्रभू यांनी सांगितले. तसेच अलिबाग व इतर समुद्रकिनारी पर्यटकांची गदी पाहता ही सर्व ठिकाणे रेल्वेने जोडण्याचाही प्रयत्न असल्याचे सांगून अलिबागचा निर्णय प्राधान्याने घेतला जाईल, असे आश्वासन दिले. तर सावंतवाडी स्थानकाचे काम ४ ते ५ महिन्यांत पूर्ण होणार असून, वृद्धांकरिता सरकते जिनेही बसवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास केंद्रीय मंत्री अनंत गिते, राज्य रेल्वेमंत्री मनोहर सिन्हा, विनायक राऊत, दीपक केसरकर, हुसेन दलवाई, खासदार राजन विचारे आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)